कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक निकालानंतर विजेत्या कार्यकर्त्यांनी एकीकडे जोरदार गुलाल उडवला असला, तर दुसरीकडे सोशल मीडियावर राजकीय राडा सुरू झाला आहे. प्रचारादरम्यान गाजलेली काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची ‘कोल्हापूरकर कसं? तुम्ही म्हणाल तसं...’ ही घोषणा आता निकालानंतर विरोधकांनी बदलून वापरण्यास सुरुवात केली आहे. ‘कोल्हापूरकर कसं? आता महायुती म्हणेल तसं!’ अशा आशयाचे मीम्स सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.
वाघ एकटा लढला विरुद्ध स्ट्राईक रेट
काँग्रेस 34 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी महायुतीचे सत्तेचे समीकरण जुळले आहे. त्यामुळे ‘त्यांनी विचारलं कोल्हापूरकर कसं? आणि कोल्हापूरकर म्हणाले महायुती म्हणेल तसं!’ अशा उपरोधिक पोस्टचे स्टेटस विरोधकांकडून ठेवले जात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्याने नेहमी निकालानंतर व्हिलन ठरणार्या ईव्हीएमला नेटकर्यांनी चक्क मजेशीर क्लीन चिट देऊन टाकली आहे. काँग्रेसच्या निसटत्या पराभवामुळे त्यांचे समर्थक भावुक झाले असून, ‘वाघ एकटा लढला’ व ‘तुम्हारी जीत से ज्यादा, हमारे हार के चर्चे है’ असे स्टेटस लावून सांत्वन करत आहेत. यावर विरोधकांकडून ‘वन मॅन आर्मी म्हणून आम्ही रडत बसलो नव्हतो’, असे प्रत्युत्तर दिले जात आहे.
कोल्हापूरकर कसं? कागलकर म्हणतील तसं...
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 4 जागा अतिशय महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे फोटो शेअर करत ‘कोल्हापूरकर कसं? कागलकर म्हणतील तसं!’ असे मेसेज व्हायरल होत आहेत. सुरुवातीला बावड्यातील सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या, तेव्हा ‘बावडेकर कसं? सतेज पाटील म्हणतील तसं,’ असे स्टेटस काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.
स्ट्राईक रेटची लढाई
एकीकडे काँग्रेसने सर्वाधिक 34 जागा जिंकल्याचा आनंद त्यांचे समर्थक साजरा करत आहेत, तर दुसरीकडे भाजपने आकडेवारी मांडत विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कोण कितीही ढोल बडवू दे, स्ट्राईक रेट तर आमचाच!’ अशा पोस्ट भाजप कार्यकर्ते करत आहेत. भाजपने 36 जागा लढवून 26 जागांवर विजय मिळवला, म्हणजेच त्यांचा स्ट्राईक रेट 72.22 टक्के इतका जबरदस्त आहे. याउलट काँग्रेसने 74 जागा लढवून 34 जागा जिंकल्या, ज्यांचा स्ट्राईक रेट 49.33 टक्क्यांवरच राहिला, याची आठवण करून दिली जात आहे.
एआयचा तडका आणि नेत्यांची टोलेबाजी
दुसरीकडे, एआय किमयेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा मोठ्या नेत्यांना चक्क हलगीच्या तालावर नाचवणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ‘अजितदादांचे चार नगरसेवक फोडा आणि आपली सत्ता आणा,’ असा सल्ला देणार्या काँग्रेस समर्थकांना महायुतीचे कार्यकर्ते, ‘अहो, तिकडे ईडी आहे, कोण येतंय?’ असे मिश्कील टोले मारत आहेत. तसेच ‘पाटलाच्या वाड्यात मक्याची कणसं... आम्ही नाय आणली भाड्याची माणसं’ अशा टोमण्यातून विरोधकांना डिवचले जात आहे.