बिद्री : पुढारी वृत्तसेवा काळम्मावाडी धरणातील पाणी विभाजनाचा प्रश्न चिघळला आहे. दूधगंगा नदीवर सुळकूड येथून इचलकरंजीला पाणी देण्याची योजना शासनाने मंजूर केली आहे. या निषेधार्थ दूधगंगा बचाव कृती समितीचे दूधगंगा व वेदगंगा काठावरील शेतकरी एकवटले असून, तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. कृती समितीने लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळविण्यासाठी कृती समितीने कागल तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची भेट घेत पाठिंबा मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २९) रोजी दुपारी बारा वाजता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी व बचाव कृती समिती समवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
इचलकरंजीसह १३ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या दूधगंगा नदीवरून इचलकरंजी पाणी योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना हाणून पाडण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कागल तालुक्यासह सीमाभागातील जनतेने विविध स्तरावर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. इचलकरंजीला पाणी दिल्यास काळम्मावाडी आराखड्यातील शेतीला पाण्याची कमरता भासणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र व सिमा भागातील लाभार्थी शेतकर्यांनी दूधगंगा बचाव कृती समिती स्थापण करून कृती समितीद्वारा विरोधाचा जनरेटा सुरु ठेवला आहे. अनेक गावांनी कर्नाटकात जाण्याच्या इशारा दिला होता. जनरेटा वाढला मात्र कागलच्या राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष होते. जनरेट्यामुळे येथील या सर्व पक्षाच्या नेत्यांनी दूधगंगा बचाव कृती समितीच्या भूमिकेला साद दिली आहे. यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, भाजपचे समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आंम्ही सर्व गट-तट, पक्ष बाजूला ठेवून बचाव कृती समिती बरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व नेतेमंडळींनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक आयोजित करून बचाव समितीचीचे म्हणणे शासनापर्यंत पोहचविण्याचे अभिवचन दिले होते.
त्यानुसार शनिवारी होणार्या जिल्हाधिकारी यांच्याबरोबरच्या बैठकीसाठी कागलमधील सर्व राजकीय नेते व दूधगंगा व वेदगंगा बचाव समितीचे सर्व शेतकरी , पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती दूधगंगा बचाव कृती समितीचे धनराज घाटगे व सागर कोंडेकर यांनी दिली.
हेही वाचा :