कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Chandrakant Patil | शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत १४ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २६ नोव्हेंबर रोजी पुकारलेले राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वी झाले. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत १०, २० व ३० वर्षांची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे, २००५ पूर्वी जाहिरात प्रक्रिया पूर्ण होऊन सेवेत रुजू झालेल्या ३८७ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्तपदे भरण्यास मान्यता देणे आणि पाच दिवसांचा आठवडा लागू करणे आदी मागण्यांवर चर्चा झाली.

पाच दिवसांच्या आठवड्यासाठी विद्यापीठांकडून माहिती मागविण्यात येणार असून, ३७४ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. १४ डिसेंबरच्या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा संयुक्त कृती समितीने दिला आहे. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अशोक मांडे, कक्ष अधिकारी विनायक टोमके, डाॅ. शैलेंद्र देवळाणकर, राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख, रावसाहेब त्रिभुवन, मिलिंद भोसले, दिनेश दखणे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT