कोल्हापूर ः शहर हद्दवाढीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर. सोबत डावीकडून अनिल घाटगे, अजय कोराणे, संजय शेटे, आर. के. पोवार, महेश जाधव, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, बाबा पार्टे, के. पी. खोत आदी.   (छाया ः मिलन मकानदार)
कोल्हापूर

हद्दवाढीसाठी मुंबईत लवकरच बैठक घेऊ : पालकमंत्री आबिटकर

उत्तर, दक्षिण, करवीरच्या आमदारांना बोलविणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी मुंबईत लवकरच व्यापक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी दिले. कोल्हापूर शहर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीसोबत आयोजित बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही हद्दवाढ होणार नसेल तर किमान महापालिकेची पुन्हा नगरपालिका तरी करा, अशी मागणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. सर्किट हाऊस येथील शाहू सभागृहात ही बैठक झाली.

आबिटकर म्हणाले, अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. याची मला कल्पना आहे. 2016 मध्ये मुंबईतील बैठकीत हद्दवाढ करण्याचा निर्णय होत असताना तो ऐनवेळी कसा रद्द झाला, त्यानंतर प्राधिकरण कसे स्थापन झाले, याची मला कल्पना आहे. परंतु तेच प्राधिकरण आता लोकांना त्रास देत असेल तर त्या अधिकार्‍यांचाही बंदोबस्त करावा लागेल. हद्दवाढीसंदर्भात बैठक घेताना शहराचे आमदार म्हणून राजेश क्षीरसागर, दक्षिणचे आ. अमल महाडिक, करवीरचे आ. चंद्रदीप नरके यांच्यासोबतच सर्व घटकांना विचारात घ्यावे लागले.

आर. के. पोवार म्हणाले, मी 1978 ला नगरसेवक झाल्यापासून हद्दवाढीचा विषय प्रलंबित आहे. आंदोलन करून आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे आता हद्दवाढ व्हायलाच हवी. बाबा पार्टे म्हणाले, अनेक मंत्री बदलले, पालकमंत्री बदलले. प्रत्येकासमोर हा विषय आम्ही मांडत आहोत. परंतु अद्याप निर्णय नाही. आता सर्वांना विचारत बसू नका. पटकन निर्णय घ्या आणि हद्दवाढ करा, कोल्हापूर शहराच्या मागून इतर शहरांची अनेकदा हद्दवाढ झाली. पण, कोल्हापूरला मागे ठेवण्यात आले.

क्रेडाईचे अध्यक्ष के. पी. खोत म्हणाले, 42 गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव होता. तो आता 20 गावांवर आला आहे. पण, पहिल्या टप्प्यामध्ये 12 गावे समाविष्ट करावीत. लगतच्या गावांचा समावेश केल्यास विकास करणे सोपे होणार आहे. भाजपचे महेश जाधव यांनी हद्दवाढीची गरज स्पष्ट केली. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी हद्दवाढीसंदर्भातील तांत्रिक माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक अनिल कदम, दिलीप पवार, किशोर घाटगे, संजय शेटे, अजय कोराणे, अशोक भंडारे, पद्मजा तिवले आदी उपस्थित होते.

दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचा खोडा

हद्दवाढीमध्ये कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघाने खोडा घातल्याचा आरोप अ‍ॅड. बाबा इंदूलकर यांनी केला. ते म्हणाले, प्रत्येक वेळेस या दोन्ही मतदारसंघाच्या राजकारणामुळे हद्दवाढीमध्ये खोडा घातला जातो. हे चुकीचे आहे. गेली 53 वर्षे आहे तेवढ्या 66.82 चौरस मीटरच्या जागेत आम्ही राहात आहोत. आता कितीतरी पटीने लोकसंख्या वाढली असून प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे हद्दवाढ काळाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT