कोल्हापूर : कोल्हापूरच्या शतकोत्तर रांगड्या कुस्ती परंपरेचा वारसा सांगणाऱ्या खासबाग कुस्ती मैदानासंदर्भात येत्या चार दिवसांत महापालिकेचे जबाबदार अधिकारी, हेरिटेज समिती व नागरी समिती यांची बैठक घेण्याचे आश्वासन प्रकल्प अभियंता सुरेश पाटील यांनी दिल्यानंतर नागरी कृती समितीचे पंचनामा आंदोलन थांबले.
खासबागेतील ऐतिहासिक पोलादी गर्डल स्क्रॅप गायब झाले, मूळ वास्तूशी विसंगत पद्धतीने अपूर्ण व चुकीचे बांधकाम झाले, तरीही अपूर्ण स्थितीत असताना ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घाईगडबडीने उद्घाटन करण्यात आले. आजही खासबाग कुस्ती मैदानाची दुरवस्था असून महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने शनिवारी नागरी कृती समितीने पंचनामा आंदोलन केले.
आंदोलक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी कुस्ती मैदानाचे बांधकाम मूळ वास्तूशी विसंगत व चुकीच्या पद्धतीने करून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून अपूर्ण स्थितीत ठेवल्याचा आरोप केला. यावर हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, सदस्य उदय गायकवाड व प्रशांत हडकर यांनी महापालिकेने हेरिटेज समितीला लेखी किंवा तोंडी विचारणा केली नसल्याचे स्पष्ट केले. आंदोलनात राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमते, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, कुस्ती प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, महेश जाधव, शाहीर दिलीप सावंत, कॉ. राजेश वरक, महादेव जाधव, रवी कांबळे, अमृत शिंदे, ईश्वरा गायकवाड आदींनी सहभाग घेतला.