कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ, सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खंडपीठ कृती समिती यांच्यात लवकरच मुंबईत संयुक्त बैठक बोलाविण्याबाबत स्वत: प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील, उपाध्यक्ष तुकाराम पाडेकर यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी आबिटकर यांची नवीन सर्किट हाऊस येथे भेट घेतली. कोल्हापूर खंडपीठ स्थापनेबाबत पालकमंत्री या नात्याने आपण पुढाकार घ्यावा, अशी त्यांना विनंती करण्यात आली. खंडपीठासाठी चाळीस वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत वकील, पक्षकारांसह सामाजिक संघटनांचा लढा सुरू आहे. आणखी किती काळ प्रतीक्षा करायची, असा प्रश्न झालेल्या चर्चेत केला. आबिटकर यांनी बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार केला. यावेळी पदाधिकारी अॅड. मनोज पाटील, सूरज भोसले, प्रमोद दाभाडे, मनीषा सातपुते, प्रीतम पातले, वैभव पाटील, निखिल मुदगल, स्नेहल गुरव, हंसिका जाधव आदी उपस्थित होते.
कोल्हापूर खंडपीठासंदर्भात यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री व खंडपीठ कृती समिती यांच्यात बैठक आयोजित करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असेही आबिटकर म्हणाले.