सासनकाठीचा अडथळा आल्यास परवाना रद्द Pudhari File Photo
कोल्हापूर

सासनकाठीचा अडथळा आल्यास परवाना रद्द

चैत्र यात्रा पार्श्वभूमीवर सासनकाठीधारक व प्रशासन बैठकीत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : जोतिबा डोंगर येथील 12 एप्रिल रोजी होणार्‍या चैत्र यात्रेनिमित्त प्रशासन आणि सासनकाठीधारक यांच्यात बैठक झाली. ज्या सासनकाठ्या अडथळा निर्माण करतील, त्या सासनकाठीधारकांचा जाग्यावरच परवाना रद्द करण्याचा निर्णय झाला. शनिवारी प्रशासन व सासनकाठीधारकांची बैठक जोतिबा डोंगर येथे झाली.

गेल्या वर्षी चैत्र यात्रेत एक मानाची उंच असणारी सासनकाठी मिरवणुकीवेळी पडली होती. त्यामुळे यात्रेतील सर्व यंत्रणा ठप्प झाली होती. त्यामुळे सासनकाठी मिरवणुकी वेळेचे प्रमाण अधिक झाले. यानंतर चैत्र यात्रेचा मुख्य पालखी सोहळा असल्याने प्रशासनाची धावपळ पहावयास मिळाली. यंदा प्रशासनाने अशा सासनकाठीधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जोतिबा चैत्र यात्रेत सहभागी होणार्‍या सासनकाठ्यांची उंची मर्यादित ठेवा व यात्रा पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले.

जोतिबा चैत्र यात्रेत सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून यात्रेसाठी सासनकाठ्या दाखल होतात. दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुख्य यात्रेदिवशी सासनकाठी मिरणुकीवेळी मोठी गर्दी असते. गर्दीवर नियंत्रण ठेवताना प्रशासनाची दमछाक होते. त्यामुळे यंदा प्रशासनाने सासनकाठीधारकांना शिस्त लागावी म्हणून नियम व अटी घातल्या आहेत. बैठकीस तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडी, अधीक्षक धैर्यशील तिवले, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग उपस्थित होते.

मद्यपी सासनकाठीधारकांवर कारवाई होणार

यात्रा काळात अनेक सासनकाठीधारक मद्य घेऊन यात्रेत धिंगाणा घालत असतात. याचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. अशा सासनकाठी धारकावर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्लास्टिक पिशवी वापरास बंदी कायम

चैत्र यात्रेच्या अनुषंगाने प्रशासन आणि व्यापारी बैठक झाली. यामध्ये प्लास्टिक पिशवी वापरात बंदी कायम केली असून व्यापारी वर्गाकडून पालखी मार्गावरील झालेल्या सर्व अतिक्रमण, तत्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT