प्रवीण मस्के
कोल्हापूर : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रतेत महत्त्वाचा बदल केला आहे. यापूर्वी अभ्यासक्रमांसाठी फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी (पीसीबी) विषयांसाठीची 80 टक्क्यांपर्यंत गुणांची अट रद्द केली आहे. ‘पीसीबी’त कितीही टक्केवारी असणारे व बारावी उत्तीर्ण या कोर्सेसला पात्र असतील. या नव्या बदलामुळे वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीय पारंपरिक वैद्यक पद्धतीसाठी (एनसीआयएसएस) राष्ट्रीय आयोगाने यासंदर्भातील अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाच्या 29 जुलैच्या पत्रानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) हे बदल 30 जुलै रोजीच्या परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहेत. आधीच्या नियमानुसार खुल्या, ईडब्ल्यूएस व आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी अशी मिळून किमान टक्केवारीचे बंधन होते. आता या नियमात बदल करण्यात आला आहे.
राज्यात ‘बीएएमएस’ची 110 महाविद्यालये असून 5 हजार 281 जागा, ‘बीएचएमएस’ची 65 महाविद्यालयात 4 हजारांहून अधिक जागा, तर बीयूएमएससाठी 400 प्रवेश जागा उपलब्ध आहेत. यापूर्वी ग्रुप सी साठी विद्यार्थी पात्र होते. ते आता ग्रुप बी साठीदेखील पात्र असतील. नवीन नियमानुसार पात्र विद्यार्थ्यांना ग्ाु्रप बी साठी पर्याय निवड आणि प्राधान्यक्रम भरता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता पूर्वीच्या तुलनेत कमी अटींमध्ये वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. परंतु, एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषात कोणतेही बदल केलेले नाहीत.