गडहिंग्लज : मला जनतेने सहा वेळा आमदार केले. 22 वर्षे मी मंत्री आहे. गडहिंग्लज परिसर माझ्याकडे येऊन तिसरी टर्म सुरू झाली, तरीही केवळ टीका करायची म्हणून मला आयात आमदार म्हणणार्यांच्या बुद्धीची कीव येते. खरे तर त्यांच्याकडे गडहिंग्लजची सत्ता असल्यामुळेच शहराचे वाटोळे झाले, असा घणाघात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता दलावर केला.
दोन दिवसांपूर्वी जनता दलाच्या बैठकीत त्यांना ‘आयात आमदार’ अशी टीका केली होती. त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले. गडहिंग्लजला राष्ट्रवादीच्या वतीने घरकूल लाभार्थ्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते. अमर मांगले यांनी स्वागत केले. हारुण सय्यद यांनी प्रास्ताविक केले. मुश्रीफ म्हणाले, मी केवळ कार्यकर्ते व जनतेच्या आशीर्वादामुळे इतकी वर्षे आमदारकीवर आहे. कोणाच्या मेहरबानीवर नाही. गडहिंग्लजला घरकुलाचे स्वप्न फार दिवसांपासून होते. मात्र, ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांच्याकडे इच्छाशक्ती नव्हती. प्रशासक होते म्हणून हे सगळे करू शकलो. केवळ थापा मारून विकासकामे होत नाहीत.
गडहिंग्लज तालुका अतिवृष्टीतून वगळलेल्या टीकेलाही उत्तर देताना त्यांचा अभ्यास कच्चा असून, जनतेच्या भल्याचे काम मी कधीही मागे ठेवत नाही. त्यांनी या संदर्भातला अभ्यास करावा आणि मग बोलावे, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. यावेळी सिद्धार्थ बन्ने, किरण कदम, संदीप नाथबुवा, राजेंद्र तारळे यांनी मनोगते व्यक्त केली.
जनता दलाच्या हातात काय आहे?
या मेळाव्यात ना. हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना जनता दलावर अजिबात टीका करू नका. त्यांच्या हातात विकासाचे काय आहे. ते शहराचा विकासच करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही फक्त विकास काय केला एवढेच जनतेसमोर सांगा, असा सल्ला दिला.