kolhapur News| एम.डी. ड्रग्जसह गांजा हस्तगत; यादवनगर येथील तस्कर जेरबंद 
कोल्हापूर

kolhapur News| एम.डी. ड्रग्जसह गांजा हस्तगत; यादवनगर येथील तस्कर जेरबंद

कर्नाटक, इचलकरंजी कनेक्शन उघड; १.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहर, उपनगरांसह ग्रामीण भागात एम.डी. ड्रग्जसह गांजा तस्करी करणाऱ्या यादवनगर येथील सराईत गुन्हेगाराला राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. महादेव दिलीप काळे (वय ४१, रा. इंडियन ग्रुपजवळ, यादवनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. संशयिताच्या कब्जातून १८ ग्रॅम ड्रग्ज, उग्र वासाचा २१० ग्रॅम गांजा असा १ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कर्नाटक आणि इचलकरंजी येथील अमली पदार्थ तस्करीचे कनेक्शन चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

अमली पदार्थ तस्करी साखळीतील काही सराईत तस्करांची नावे चौकशीतून पुढे येत आहेत. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी राजारामपुरी पोलिस ठाण्याची विशेष पथके कर्नाटकात बेळगाव, रायबाग, चिकोडीसह इचलकरंजीकडे रवाना झाली आहेत. एम.डी. ड्रग्ज, गांजा कोणासाठी मागविण्यात आला होता. याचीही कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

यादवनगर येथील संशयित महादेव काळे अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याचा सुगावा पथकाला लागला होता. सहायक पोलिस निरीक्षक अनिता पवार, उपनिरीक्षक सचिन चंदनसह पथक संशयितांच्या मागावर होते. सरनोबतवाडी, टोलनाका तसेच राजाराम तलाव प्रवेशद्वाराजवळ पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे १ लाख ८० हजार रुपये किमतीचा १८ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, २१० ग्रॅम गांजा, मोबाईल, ७ हजार ४०० रुपयांची रोकड असा १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांची कसून चौकशी सुरू असून, रॅकेटमधील साखळी उघडकीला येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक जाधव यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT