कोल्हापूर : पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन ही अधिकार्यांची जबाबदारी नाही का? आम्ही तुम्हाला मदत करतो, त्याचा गैरफायदा घेऊ नका. आमचा तुमच्यावर ‘वॉच’ आहे. अधिकार्यांना जमत नसेल तर बाहेरच्या कंपनीला काम देऊ. इन्कम होत नसेल तर कुटुंबप्रमुख म्हणून आयुक्तांचे लक्ष आहे की नाही? कोल्हापूरची वाट लागली आहे, असा जाब महापौर रूपाराणी निकम यांनी पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत विचारला.
महापालिकेतील एकही विभाग फायद्यात नाही. पाणीपुरवठ्याचा तर दुपटीने खर्च आहे, असा गलथान कारभार चालणार नाही. काम करत नसतील तर अधिकारी पाहिजेतच कशाला? पैसेच मिळत नसतील तर तोट्यातील पाणीपुरवठा चालवायचाच कशाला? असा उद्विग्न सवाल करत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे कोल्हापूर खड्ड्यात जात आहे. पैसे आणून द्या अन् पगार घ्या; अन्यथा अधिकार्यांचे पगार बंद होतील, असा इशाराही महापौर निकम यांनी गुरुवारी दिला.
1.22 रुपयाचे पाणी 9.50 रुपयांना विकूनही तोटा कसा?
पाणीपुरवठ्याविषयी महापालिकेत बैठक झाली. आयुक्त के. मंजुलक्ष्मी, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी गटनेता आदिल फरास उपस्थित होते. महापौर निकम यांनी महिन्याला पाणीपट्टी किती जमा होते? जलसंपदाची 165 कोटी थकबाकी कशी? 1.22 रुपये कच्चे पाणी घेऊन 9.50 रुपयांना जनतेला देत असूनही जलसंपदा विभागाची थकबाकी का? कनेक्शन किती आहेत? अशी विचारणा जलअभियंता हर्षजित घाटगे यांना केली.