कोल्हापूर : हलगीच्या कडकडाटावर नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी धरलेला ठेका, गुलालाची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी करत नूतन महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांच्या जल्लोषात विजयी मिरवणुका निघाल्या. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर विजयाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. महापौर, उपमहापौर यांनी महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला.
कोल्हापूर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया शुक्रवारी झाली. महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम यांचे, तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांचे नाव अगोदरच निश्चित झाले होते. त्यामुळे दोघांचेही समर्थक सकाळी 9 वाजल्यापासूनच महापालिका प्रवेशद्वारासमोर एकत्र आले होते. गुलालाची उधळण करण्यासाठी ब्लास्ट मशिन, मिरवणुकीसाठी फुलांची आकर्षक सजावट केलेली वाहने, हातामध्ये पक्षांचे झेंडे, महापौर, उपमहापौर, नेत्यांचे कटआऊट आणि आतषबाजीसाठी फटाके घेऊन कार्यकर्त्यांनी मिरवणुकीची जय्यत तयारी केली होती.
महापौर निवड प्रक्रियेदरम्यान पावणेबारा वाजण्याच्या सुमारास निकम यांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. तर, पाठोपाठ जरग यांच्याही समर्थकांनी हलगीच्या कडकडाटावर ठेका धरला. यानंतर महापालिकेबाहेर महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. यावेळी आमदार अमल महाडिक, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, जयंत पाटील, किरण नकाते, शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजीराव जाधव आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिका परिसरात पोलिस बंदोबस्त
महापौर, उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. अपर पोलिस अधीक्षक बी. धीरजकुमार, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील येथे उपस्थित होते. महापालिकेच्या प्रवेशद्वारापासून जाणारा मार्ग वाहतुकीस बंद केला होता. तर, विजयी मिरवणुकीदरम्यान काही काळासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला. तसेच, महापालिका प्रवेशद्वारासमोरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
महापुरुषांना अभिवादन
निवडीनंतर नूतन महापौर निकम, उपमहापौर जरग यांनी महापालिका प्रवेशद्वारालगत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जात येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महिला कार्यकर्तींचाही जल्लोष
मिरवणुकीदरम्यान माळकर तिकटी येथे महिला कार्यकर्तींनीही जल्लोष केला. हलगीच्या कडकडाटावर महिलांनी ठेका धरला. तर, काही महिलांनी फुगडी घालत आनंदोत्सव साजरा केला.