कोल्हापूर : निधीअभावी कोल्हापूर शहरातील विकासकामांना मर्यादा येत आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून कोल्हापूरच्या प्रगतीसाठी अधिकाधिक निधी मिळवून द्यावा, अशी विनंती महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासह पदाधिकार्यांनी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना बुधवारी (दि. 20) केली. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये शहराच्या लोकसंख्येचा निकष अत्यंत महत्त्वाचा असतो. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. त्यामुळे कोल्हापूरच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि विस्ताराचा योग्य विचार होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाऊसिंगजी रोडवरील ‘पुढारी भवन’ येथील डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन शहर विकासासंदर्भात चर्चा केली. उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, शिवसेना नेते शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
महापौर निकम, आयुक्त डॉ. भारूड यांनी कोल्हापूर प्राधिकरणला राज्य शासनाने विशेष दर्जा दिल्याचे नमूद केले. मात्र, शहर हद्दवाढीची अधिसूचना जनगणनेच्या अधीन राहून प्रसिद्ध झाल्यास तिसरा विकास आराखडा अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असे सांगितले. तसेच शहरातील ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन नव्याने निश्चित करण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती डॉ. प्रतापसिंह जाधव यांना केली.
आयुक्त डॉ. भारूड म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूरसाठी 524 कोटींचा एम. आर. डी. पी. तून प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत कोल्हापूर शहरातील नदी, नाल्यांतील गाळ काढून पात्रे रुंद केली जाणार आहेत. नाल्याभोवती संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. यामुळे 50 टक्के पाणीवहन क्षमता वाढणार आहे. गेल्या पाच वर्षांत पूर आलेला नाही आणि या प्रकल्पामुळे भविष्यात पूर येण्याची शक्यता नाही.
डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, कोल्हापूर शहराची ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन 2021 मध्ये करण्यात आली. प्रत्येक चार वर्षांनंतर त्याचा आढावा घेऊन ब्ल्यू लाईन सुधारित करणे आवश्यक आहे; मात्र अद्याप त्याचा फेरआढावा घेतलेला नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना नव्याने पाहणी करून सुधारित ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन निश्चित करण्याच्या सूचना देण्यात येतील. त्यामुळे कोल्हापुरात विकासासाठी जमीन उपलब्ध होईल, असेही सांगितले.
पूर नियंत्रणाबाबत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले की, 2021 पूर्वी कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती गंभीर होत होती. मात्र, तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेव्हापासून पावसाळ्याच्या कालावधीत अलमट्टी धरणाच्या नियंत्रण कक्षात महाराष्ट्रातील अभियंत्यांचीही नियुक्ती केली. पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून वेळेत पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने 2021 ते 2025 या पाच वर्षांच्या कालावधीत पूर आला नाही. त्यामुळे पूरस्थिती नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या विकासासाठी मार्गदर्शन करा
कोल्हापूर शहरातील ठिकठिकाणचे चौक, आयलँड, उद्याने, फुटपाथ आदी सुशोभित करण्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा करू. त्या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी महापौर निकम, आयुक्त डॉ. भारूड यांना दिली. यावेळी आयुक्त डॉ. भारूड यांनी डॉ. जाधव यांना कोल्हापूरच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली.