दत्तवाड : दूधगंगा नदीत पाणी उपलब्ध आहे. महाराष्ट्रात बंदी; मात्र कर्नाटकात उपसा सुरू आहे.  (छाया : शहानवाज अपराध)
कोल्हापूर

Water Lifting Karnataka Border | कर्नाटकात उपसा जोरात; महाराष्ट्रात मात्र अन्याय

दूधगंगा नदीकाठाला फटका; दत्तवाड परिसरातील शेतकऱ्यांची नाकेबंदी

पुढारी वृत्तसेवा

संतोष बामणे

जयसिंगपूर : धरणांत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने कृष्णा खोऱ्यात उपसाबंदी लागू केली आहे. याचा फटका दूधगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांना बसत आहे. नदीच्या एका बाजूला महाराष्ट्र, तर दुसऱ्या तीरावर कर्नाटक असल्याने नदीत पाणी असूनही शेतकऱ्यांना उपसाबंदी आहे. दुसरीकडे, मात्र कर्नाटक हद्दीतून सुमारे १० हून अधिक गावांतून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस पाण्याचा उपसा केला जात आहे. हे पाणी फक्त नदीकाठावरच पोहोचत नसून २५ कि.मी.वर असलेल्या चिक्कोडी शहरापर्यंत पोहोचत आहे.

सुळकूड (ता. कागल) येथील बंधाऱ्यापुढे दूधगंगा नदी कर्नाटक राज्यात प्रवेश करते. गजबरवाडी, कुन्‍नूर, मांगूर, बारवाड, कारदगा, बेडकिहाळ, चांद शिरदवाड, बोरगाव, सदलगा, मलिकवाड, एकसंबापर्यंत येऊन ही नदी दानवाडजवळ कृष्णा नदीला मिळते. तर, महाराष्ट्र हद्दीत शिरोळ तालुक्यात घोसरवाड, दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड ही गावे आहेत. गेल्या ४ महिन्यांत ८ ते १० वेळा दूधगंगा नदी कोरडी पडल्याने दत्तवाड परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. सध्याही कोल्हापूर जिल्ह्यात उपसाबंदी लागू असल्याने दत्तवाड भागातही पाणी सुरू करता येत नाही.

मात्र, नदीपलीकडे कर्नाटक हद्दीतील गावांतून रोज रात्रंदिवस उपसा सुरू आहे. पाणी नदीकाठच्या गावांबरोबरच अगदी चिक्कोडीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे नदीत पाणी असूनही फक्त उपसा करता येत नसल्याने दत्तवाड परिसरातील शेतकऱ्यांचा जीव हळहळत आहे. एकीकडे पिकांची होत असलेली होरपळ आणि दुसरीकडे कर्नाटकात होत असलेला उपसा, यामुळे सरकारच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांच्या मुळावर बसत आहे. त्यामुळे तातडीने दत्तवाड भागात उपसाबंदी रद्द करण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

४ महिन्यांत ८ ते १० वेळा दूधगंगा नदी कोरडी पडली होती. सध्या दूधगंगा नदीत पाणी आहे. मात्र, महाराष्ट्रात उपसाबंदी असल्याने आम्हाला पाणी घेता येत नाही. दुसरीकडे, मात्र कर्नाटक हद्दीतून लाखो लिटर पाण्याचा उपसा रात्रंदिवस सुरू आहे. त्यामुळे सरकारने तातडीने दूधगंगा काठावरील दत्तवाड भागातील उपसाबंदी मागे घ्यावी. उपसाबंदीने आमचे मोठे नुकसान होत आहे.
गजानन शिंदे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT