Oxygen Cylinder Explosion | उद्यमनगरात फॅब्रिकेशन कारखान्यात ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट 
कोल्हापूर

Oxygen Cylinder Explosion | उद्यमनगरात फॅब्रिकेशन कारखान्यात ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने परिसर हादरला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर येथील उचगावकर आयर्न वर्क्स या फॅब्रिकेशन कारखान्यात मंगळवारी सायंकाळी ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने उद्यमनगरसह परिसर हादरला. घटनेत प्राणहानी झाली नाही. मात्र, कारखान्यातील शेडसह साहित्य उद्‌ध्वस्त झाले. स्फोटाच्या आवाजाने परिसरामध्ये घबराट पसरली. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

उचगावकर आयर्न वर्क्स कारखान्यात बांधकामासाठी लागणाऱ्या मिक्सर, रोलर चक्कीसह अन्य साहित्यांची निर्मिती केली जाते. वेल्डिंगसह लोखंडी कटिंगसाठी गॅस सिलिंडरसह ऑक्सिजन सिलिंडरचाही वापर केला जातो. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमाराला वेल्डिंगला जोडलेल्या केबलला शार्टसर्किट होऊन आग लागली. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग प्रतिबंध फवाऱ्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचा भडका होण्याची शक्यता दिसताच व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना तत्काळ सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणात ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा स्फोट झाला.

सिलिंडरचा स्फोट इतका भीषण होता की, कारखान्याच्या शेडचे पत्रे उडाले. भिंतींना तडे गेले. काही लोखंडी तुकडे रस्त्यावर उडून पडले. कारखान्याजवळील एका मोपेडचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्‍निशमन दलाच्या प्रतिभानगर, टिंबर मार्केट येथील पाण्याचे बंब तातडीने दाखल झाले. पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणण्यात आली.

सुदैवाने जीवितहानी टळली

ऑक्सिजन सिलिंडरच्या शक्तिशाली स्फोटामुळे शिवाजी उद्यमनगरसह परिसरात कानठळ्या बसणारा मोठा आवाज झाला. उद्योग व्यावसायिकांसह कारखानदार तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक मनोज कदम यांच्यासह पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रात्री उशिरा राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT