Terwad Parvati Spinning Mill  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Fire | तेरवाड येथील पार्वती सूत गिरणीत भीषण आग; सूत, कापूस, मशिनरी जळून खाक

शॉर्टसर्किटने ठिणगी पडून सूत, कापसाला आग

पुढारी वृत्तसेवा

Terwad Parvati Spinning Mill

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे असलेल्या पार्वती सहकारी सूत गिरणीत बुधवारी (दि.१५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात सूत, कापूस तसेच महागडी मशिनरी जळाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरणीत अचानक शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडली आणि काही क्षणांतच सूत व कापूस यांना आग लागून ती झपाट्याने पसरली. गिरणीतील ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. धूराचे लोट आणि ज्वाळा दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नितीन संकपाळ,रमेश शेलारे, हेमंत वायचळ, यश शिरोळकर या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी काही काळ प्रयत्न सुरू होते.दरम्यान, आग लागल्याची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनीही खबरदारीची उपाययोजना केली.

या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाडचे माजी नगरसेवक उदय डांगे, शुभम जोग, बाळासाहेब देसाई तसेच आदित्य पाटील (यड्रावकर) यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली व अग्निशमन दलाच्या कार्याचा आढावा घेतला.या आगीमुळे गिरणीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT