वाघवे : पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील जंगलाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (दि.५) घडली. वाघवे पैकी सुर्वेवाडी इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील पालापाचोळा पेटवत असताना दुर्लक्ष केल्याने जंगलाला भीषण आग लागल्याचे समजते. आग लागल्याची माहिती वाघवे येथील तरुणांना समजताच आग विझवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले.
आगीने रौद्र रूप धारण केल्याने सुमारे 10 ते 12 एकर परिसरातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वाघवे इथल्या वनक्षेत्रात वृक्षलागवड करून झाडं जगवण्यासाठी तरुणांची धडपड सुरू आहे. त्यातच वनक्षेत्रात भीषण आग लागल्याने वनसंपदा वाचवण्यासाठी तरुणांनी हातात झाडांचे ढाळे घेवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले.
आग विझविण्यासाठी वाघवे इथल्या अजित केर्लेकर, अमोल केर्लेकर, सरदार सातपुते, सतीश शेलार यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. तरुणांच्या या धाडसाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.