टाकवडेत नमकीन पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान File Photo
कोल्हापूर

टाकवडेत नमकीन पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

शॉर्टसर्किटने कच्या पक्क्या मालासह महागडी यंत्र सामग्री जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण/पुढारी वृत्तसेवा

टाकवडे (ता.शिरोळ) येथील रविंद्र विनायक पोळ यांच्या मालकीचे आनंदी नामक नमकीन व स्वीट्स बनविणाऱ्या कारखान्याला आज (सोमवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. या दरम्यान चार गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे कारखान्यातील कच्चा माल, तयार माल, तेलाचे डबे यासह अनेक मशीनरी जळून खाक झाल्या आहेत.

आगीने रौद्ररूप धारण केले होते. धूर व आगीचे लोट बाहेर पडत असल्याने या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये सुमारे पन्नास लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग आटोक्यात आणत असताना एक कामगाराला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टाकवडे-जांभळी रस्त्यावर पोळ यांचा नमकीन बनविण्याचा कारखाना आहे. यामध्ये केळी, बटाटा, वेफर्स, फरसाण, राजिगरा लाडू, गोड तसेच उपवासाचे अनेक पदार्थ तयार केले जातात. रविवारी रात्री सर्व काम आटोपून रविंद्र पोळ व त्यांचे कामगार घराकडे गेले. दरम्यान पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटने भीषण आगा लागली. यामध्ये सिलेंडरचे मोठे स्फोट झाल्याने आवाजाने शेजारी राहणाऱ्या कामगारांनी व नागरिकांनी आरडाओरडा केला. तसेच गावातील अनेक लोकांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली. यावेळी पंचगंगा शुगर, दत्त शुगर, इचलकरंजी महानगरपालिका, कुरुंदवाड नगरपालिका यांच्याकडील एकूण पाच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्‍या. त्‍यांनी तीन तासानंतर जवानांनी अथक प्रयत्नांतर आगीवर नियंत्रण मिळविले.

या कारखान्यात नमकीनचे पदार्थ बनवून कर्नाटक तसेच महाराष्ट्र येथील विविध भागात विक्री केली जाते. लाखो रुपये खर्चून पोळ यांनी या ठिकाणी मोठे बांधकाम व पत्राचे मोठे शेड उभारले आहे. विविध प्रकारच्या महागड्या मशनरी बसविल्या आहेत. तसेच या ठिकाणी स्थानिक व परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात कामाला आहेत. मात्र अचानक ही दुर्दैवी घटना घडल्याने मालक पोळ यांना धक्का बसला असून कामगार व ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान शिरोळ पोलीस ठाण्याचे अभिजित कांबळे, व पटेल यांनी या ठिकाणी पाहणी करून पंचनामा केला आहे.

शॉर्टसर्किटने आग लागल्यानंतर भरलेले सिलेंडर टाकिंचा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की, शेजारी असणाऱ्या घरातील भांडी पडल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. शिवाय गावात अर्धा किलोमीटर अंतरावर या स्फोटाचा आवाज गेला. स्फोटामुळे कारखान्याच्या छताचे चितडे उडाले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT