आशिष शिंदे
कोल्हापूर : पश्चिम घाटामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व जैवविविधता जपणार्या कोल्हापुरातील मसाई पठार, राधानगरी वन्यजीव अभयारण्याबरोबरच पंचगंगा नदीकाठी जैवविविधतेची संपन्नता संशोधनातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा सगळा परिसर जैवविविधतेचे ऐश्वर्य जपत असून जागतिक पातळीवर बायोडायव्हर्सिटी रिच झोन म्हणून त्याची नैसर्गिक संपन्नतेच्या वारशामध्ये भरीव मुद्रा उमटली आहे. ऐवढेच नव्हे, तर परागीकरण करणारे व शिकारी कीटक तसेच नैसर्गिकरीत्या सेंद्रिय विघटन करणारे व जमिनीची सुपीकता वाढवणारे घटक हे या संपन्नतेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
जिल्ह्यातील विविध परिसंस्थांमध्ये 14 वेगवेगळ्या कीटक वर्गांतील एकूण 75 कीटक जाती आढळून आल्या. जैवविविधता निर्देशांकानुसार, या कीटकांची विविधता मध्यम ते चांगल्या दर्जाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या जैवविविधतेचा खरा ठेवा झाडाझुडपांमधून नव्हे, तर झाडांच्या पानांवर, जमिनीच्या वरच्या थरात आणि फुलांच्या परागांभोवती वसलेल्या सूक्ष्म कीटकांमध्ये लपलेला आहे. नुकत्याच एका शास्त्रीय अभ्यासात जिल्ह्यातील विविध परिसंस्थांमध्ये 75 जातींचे कीटक आढळून आले असून, त्यांचा निसर्गचक्रातील सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित झाले आहे. या कीटकांमध्ये मधमाश्या, बटरफ्लाय, बीटल्स, अँट लायन्स, लेडीबर्डस्, हॉवर फ्लाय, अॅसॅसिन बग्स यांचा प्रामुख्याने समावेश होता. हे कीटक केवळ परिसंस्थेतील संतुलन राखत नाहीत, तर शेतीसाठीही आवश्यक असतात. परागीकरणामुळे उत्पादन वाढते, शिकारी कीटक पिकांवरील हानिकारक किडींना नियंत्रित करतात, तर विघटन करणारे घटक मातीच्या पोषणचक्रात मोलाची भूमिका बजावतात.
जैवविविधतेचे ‘रिच झोन’ म्हणजे असे भौगोलिक भाग जिथे प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांची संख्या आणि विविधता दोन्ही उच्च पातळीवर असते. अशा भागांची ओळख विशिष्ट पद्धतीने घेतलेल्या क्षेत्रीय सर्वेक्षणांद्वारे होते. तिथे किती वेगवेगळ्या जीवजंतूंच्या जाती आढळतात, त्यांचे प्रमाण, त्यांच्या अधिवासाची स्थिती आणि त्यांचे पारिस्थितिक कार्य यावरून त्या भागाचे जैववैविध्य समजते.
जैवविविधता निर्देशांक (बायोडायव्हर्सिटी इंडेक्स) ही एक शास्त्रीय संकल्पना आहे, जी एखाद्या क्षेत्रातील जीवांची विविधता मोजण्यासाठी वापरली जाते. यामध्ये एकूण कीटकांच्या किती जाती आणि त्या जाती किती प्रमाणात व संतुलितपणे आढळतात हे मोजले जातात. या निर्देशांकानुसार जिल्ह्यात आढळलेले कीटक मध्यम ते चांगल्या दर्जाचे जैववैविध्य दर्शवतात. म्हणजेच इथे अनेक जाती असून त्या तुलनात्मकरीत्या संतुलितपणे आढळतात.