कोल्हापूर : हॉकी स्टेडियम परिसरातील महापालिकेच्या बंद इमारतीमध्ये छापा टाकून गांजा विकणार्या दोघा तरुणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अर्धा किलो गांजा, एक मोपेड, दोन हजार रुपये, दोन मोबाईल असा 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गुरुवारी सायंकाळी (दि.26) ही कारवाई केली. कुणाल किरण सांगवडेकर (वय 25, रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगाव), भूषण रंगराव पाटील (23, रा. पोवार कॉलनी, पाचगाव) अशी त्यांची नावे आहेत. शहरातील हॉकी स्टेडियम येथील महापालिकेच्या बंद इमारतीमध्ये गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी भूषण व कुणाल गांजा विक्री करत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन मोपेडची तपासणी केली असता, अर्धा किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी या दोघांनाही अटक करून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.
कळंब्यातील गण्याकडून गांजा खरेदी
भूषण व कुणाल या दोघांनीही कळंब्यातील गण्याकडून गांजाची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. जुना राजवाडा पोलिस गण्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पाचगाव येथील आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे.