कोल्हापूर; सेंट्रल डेस्क : दिवाळीच्या सणात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असतानाही उत्पादनात वाढ आणि बाजारपेठेतील आवक यामुळे फुलांचे भाव घसरले आहेत. सणासुदीच्या काळात चांगला दर मिळेल, या अपेक्षेने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. लागवड, मजुरी, तोडणी आणि वाहतूक खर्चाचा ताळमेळ साधणेही अवघड झाल्याने झेंडू उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
झेंडूची फुले दसरा आणि दिवाळीच्या काळात घरोघरी सजावट, तोरणे, हार तसेच वाहनांच्या पूजेसाठी वापरली जातात. त्यामुळे या काळात फुलांना मोठी मागणी असते. मात्र, यंदा कमी पावसामुळे फुलांचे नुकसान तुलनेने कमी झाले आणि उत्पादनात वाढ झाली. छत्रपती संभाजीनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, झेंडूचे एकरी उत्पादन १५ ते २० क्विंटलपर्यंत मिळाले. उत्पादन वाढले; परंतु त्या प्रमाणात दर मिळत नसल्याचे चित्र आहे.
पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात १८ आणि १९ ऑक्टोबरदरम्यान दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २०० ते ३०० टन फुलांची आवक झाली होती. झेंडूला दर्जानुसार ३० ते ७० रुपये किलो दर मिळाला. मात्र, त्यानंतरच्या बाजारभावात आणखी घसरण दिसली. २७ ऑक्टोबरच्या नोंदीनुसार पुणे बाजारात २२६ क्विंटल झेंडूची आवक झाली. किमान दर एक हजार रुपये, कमाल तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर १,५०० रुपये प्रतिक्विंटल होता. म्हणजेच सरासरी अवघा १५ रुपये किलो भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरच्या बाजारातही १९ ऑक्टोबरला झेंडूचे घाऊक दर १० ते २० रुपये किलोपर्यंत घसरल्याचे वृत्त आहे. किरकोळ बाजारात मात्र ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत होती.
झेंडूची फुले नाशवंत असल्याने ती जास्त काळ साठवून ठेवता येत नाहीत. त्यामुळे कमी भाव मिळत असतानाही शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे. बाजारात आवक वाढल्यास दर कोसळतात, तर वाहतूक आणि मजुरीचा खर्च कायम राहतो. परिणामी, ग्राहकांना तुलनेने स्वस्त फुले मिळत असली, तरी उत्पादकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. बाजारपेठेतील आवक आणि मागणी यांचा समतोल राखण्यासाठी फुलशेती उत्पादकांना नियोजनबद्ध विक्री व्यवस्था आणि थेट बाजारपेठेची उपलब्धता मिळण्याची गरज व्यक्त होत आहे.
शुभत्वाचे प्रतीक : झेंडूची पिवळी आणि केशरी फुले समृद्धी, मांगल्य, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जातात.
तोरण व सजावट : दिवाळीत घराचे प्रवेशद्वार, अंगण, देवघर व दुकानांच्या सजावटीसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते.
पूजाविधीत महत्त्व : लक्ष्मीपूजन, गणेशपूजन तसेच अन्य धार्मिक विधींमध्ये झेंडूच्या फुलांचा आणि हारांचा वापर केला जातो.