कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. यानिमित्त राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधव एकत्र आले आहेत. त्याअनुषंगाने कोल्हापूर सकल मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करीत दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ आदी घोषणांनी परिसर दणाणून निघाला. मागणीला धनगर, मुस्लिमसह अन्य समाजांनी पाठिंबा दिला. आंदोलनात महिलांचा सहभाग मोठा होता.
यावेळी वसंतराव मुळीक, रुपेश पाटील, राहुल इंगवले, सचिन चव्हाण, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, राजू सावंत, संभाजीराव जगदाळे, शैलजा भोसले, सुनीता पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले होते.