कोल्हापूर

छगन भुजबळांची सरकारमधून हकालपट्टी करा

मोहन कारंडे

मुरगूड; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणारे तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीला आपल्या बेताल वक्तव्याने अपशकुन करणाऱ्या मंत्री छगन भुजबळांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी. मराठा व ओबीसी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कागल तालुका सकल मराठा समाजामार्फत करण्यात आली आहे.

मुरगुड येथील अंबाबाई मंदिरात याबाबत बैठक आयोजित करण्यात होती. यावेळी मराठा समाज एकजुट व वज्रमुठीतून पुढे आलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला काही विघ्न संतोषी लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी अपप्रचार व बुद्धीभेद करत आहेत. हे मराठा बांधवांनी वेळीच ओळखून सकल मराठा आरक्षण अंतिम लढाईसाठी सज्ज राहावे, असे अहवान मराठा समाज कागल तालुका समन्वयक प्रमुख अॅड. दयानंद पाटील-नंद्याळकर यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक राणोजी गोधडे होते.

यावेळी राज्य समन्वयक अमरसिंह जगदाळे (सरकार), सकल मराठा मुरगूड समन्वयक शहर प्रमुख संतोष भोसले, विशाल मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. मराठा समाज कागल तालुका समन्वयक प्रमुख मयूर सावर्डेकर, उद्योगपती अरुण व्हाराबळे, सुहास खराडे, संदीप भारमल, नामदेव भराडे आदी. प्रमुख उपस्थित होते. ओबीसी व मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते मुरगूड शहर समन्वयक सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, जगदीश गुरव, युवराज विष्णू कांबळे (मळगे) यांनी आरक्षण मागणीस पाठिंबा देऊन मराठी बांधवांच्या आरक्षणाच्या लढाईत खांद्यास खांदा देऊन लढण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी वर्षानुवर्षे रखडलेल्या आरक्षणाबाबत २४ डिसेंबर पर्यंत शासन स्तरावर निर्णय घ्यावा. यासाठी सकल मराठा समजाकडून तालुक्यातील गावागावात व्यापक जनजागृती करून ठिय्या आंदोलन, उपोषण व निदर्शने या मार्गाने उत्तरोत्तर मराठा आरक्षण आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

या बैठकीस दत्ता साळोखे, हर्षवर्धन पाटील, आकाश पाटील (सुरूपली), कृष्णात सोनाळे, अमर चौगले, संकेत भोसले, पांडुरंग मगदूम, प्रविण नेसरीकर, सोमनाथ येरणाळकर, रणजित मोरबाळे, मारुती वाडकर, उत्तम व्हाराबळे, मधुकर गोधडे, प्रवीण वास्कर, प्रकाश पारीशवाडकर यांच्यासह कागल तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते हजर होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT