कोल्हापूर : मराठा आरक्षण आंदोलनाची सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी. याबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असताना महायुतीचे नेते या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे पत्रक खासदार शाहू महाराज यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळेची लढाई आरपारची असल्याने कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्याच्या मन:स्थितीत मराठा समाज दिसत नाही. यामुळे आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी महाराष्ट्र शासनावर आहे. मराठा समाजाची सहनशीलता संपल्याने आंदोलनाला वेगळे वळण देऊन प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा नेहमीचा प्रयत्न सरकारने करू नये. अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवावी आणि त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करावी, अशी आपली भूमिका असल्याचे खा. शाहू महाराज यांनी पत्रकात म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णयात महाविकास आघाडीसह सर्व पक्षांना विश्वासात घेण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शनासह मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करावी, अशी मागणीही खा. शाहू महाराज यांनी पत्रातून केली आहे.