कोल्हापूर : मराठा आणि कुणबी हे एकच आहेत याचा पुरावा असणार्या कोल्हापूर गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी बुधवार, दि. 1 ऑक्टोबरला खंडेनवमीदिवशी आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंदुलकर म्हणाले राज्यात एसईबीसी आरक्षण आणि गॅझेटच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवरून मिळणारे आरक्षण अशा दोन पातळीवर लढाई करण्याची गरज आहे. हैदराबाद, सातारानंतर कोल्हापुरातही ब्रिटिशकालीन गॅझेट आहे. कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती एकच असल्याचे नमूद केले आहे. मराठा आरक्षणासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून या नोंदीआधारे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू शकते. त्यामुळे कोल्हापूर गॅझेटचा आधार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील मराठ्यांना कुणबी दाखले द्यावेत या मागणीसाठी प्रशासकीय पातळीवर संघर्ष करण्यात येणार आहे.
या लढ्याची सुरुवात विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एक ऑक्टोबरला सकाळी 11 वा. खंडेनवमीच्या निमित्ताने केली जाणार आहे. या आरक्षण लढ्यासाठी महत्त्वाचे हत्यार असणारे कोल्हापूर गॅझेट, पेन आणि भारतीय संविधान या शस्त्रांची पूजा खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते करून या लढ्याचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. शस्त्रपूजनानंतर दोन ऑक्टोबर पासून मराठा समाजातील विविध संघटनांना एकत्रित करून कोल्हापूर गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी व्यापक लढ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख 40 हजार 312 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. मात्र यापैकी कुणालाही अद्याप कुणबी दाखले दिलेले नाहीत. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व मराठ्यांना कुणबी दाखले द्यावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे, असेही इंदुलकर म्हणाले.