कोल्हापूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने खासगी हॉस्पिटलमधील तज्ज्ञांना मानसेवी तत्त्वावर घेणार आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शनिवारी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आयोजित सत्कार समारंभ व गर्भाशयमुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, जनआरोग्य योजना सुरू असणार्या रुग्णालयात पैसे का मागितले जातात, याचे कोडे मला समजलेले नाही. डॉक्टरांनी रुग्णांना योजना समजावून सांगावी. कोल्हापूरला मेडिकल हब आणि टुरिझम हब करण्यासाठी प्रयत्न करू. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, केएमए, यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट, कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मुंबई यांचे गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाचे काम चांगले आहे. वाढती कॅन्सरची संख्या लक्षात घेता अशा प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम राज्यभर राबवणार आहे.
यावेळी आबिटकर व मुश्रीफ यांचा कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. कॅन्सर पेशंट एडच्या कार्यकारी संचालिका डॉ. नुपूर खरे, डॉ. राधिका जोशी, डॉ. सतोष प्रभू, डॉ. उल्हास दामले, डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. अजय केणी, डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. अर्चना पवार, डॉ. बाबासाहेब शिर्के, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. शीतल पाटील, डॉ. आशा जाधव, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. हणमंत पाटील, डॉ. विद्युत शहा, डॉ. महावीर मिठारी, डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शीतल देसाई यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. उन्नती सबनीस यांनी केले.
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणासाठी सीएसआर फंड देतो. माझ्या मतदारसंघातील मुलींना ही लस तुम्ही द्याल का?, त्यासाठी निधी आणतो, असे मुश्रीफ यांनी डॉक्टरांना सांगताच आबिटकर यांनी, साहेब तुमच्यावर राज्याची जबाबदारी आहे, असे म्हटले. त्यावर एकच हशा पिकला.
मुंबईतील मोठ्या रुग्णालयात जनआरोग्य योजना नाही. ते घेतही नाहीत, कारण त्यांना वैद्यकीय उपचारांचे खर्च कमी करावे लागतील याची भीती वाटते. मंत्री आबिटकर यांनी यात लक्ष घालावे, असे मुश्रीफ म्हणाले.
डॉक्टरांनी गोरगरिबांना वैद्यकीय बिलात सवलत द्यावी. बिलात सूट देण्यासाठी आम्ही अनेकांना सांगतो. काही ऐकतात, पण काही ऐकत नाहीत. ते आम्हाला पाठ झाले आहे, असा टोलाही मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.