कोल्हापूर

‘युवाशक्ती दहीहंडी’चा मानकरी नेताजी पालकर ग्रुप

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अलोट गर्दीने गोविंदा पथकांचा दुणावलेला आत्मविश्वास, संगीताच्या ठेक्यावर ताल धरत गोविंदांना प्रोत्साहित करणारी सळसळती तरुणाई… अशा उत्साही आणि जल्लोषी वातावरणात चित्तथरारक मानवी मनोरे रचून धनंजय महाडिक युवाशक्तीची 'युवाशक्ती दहीहंडी' फोडून गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायामशाळा हे गोविंदा पथक यंदाचे मानकरी ठरले. सात थरांचा मानवी मनोरा रचून नेताजी पालकर गोविंदा पथकाने तीन लाखांचे बक्षीस पटकावले.

खा. धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सायंकाळी 'युवाशक्ती दहीहंडी'चे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेस सुरुवात झाली. दुपारी चार वाजल्यापासून दसरा चौकात नागरिकांची वर्दळ सुरू झाली. सायंकाळी सातनंतर चौक आबालवृद्धांच्या गर्दीने फुलून गेला. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

रात्री पावणेआठच्या सुमारास गोविंदा पथकांनी सलामी देण्यास सुरुवात केली. शिवगर्जना गोविंदा पथक (तासगाव), नृसिंह गोविंदा पथक (कुटवाड), नेताजी पालकर व्यायामशाळा, जय महाराष्ट्र गोविंदा पथक आणि संघर्ष ग्रुप गोविंदा पथक (गडहिंग्लज), गोडी विहीर गोविंदा पथक (शिरोळ), जय हनुमान तालीम गोविंदा पथक (शिरोळ) या पथकांनी सलामी दिली. गोडी विहीर गोविंदा पथक कमी थर लावल्याने सलामीतच स्पर्धेतून बाहेर पडले. त्यामुळे उर्वरित सहा संघांत ड्रॉ काढण्यात आला. यावेळी हंडीची उंची पाच फुटांनी कमी करण्यात आली. पहिल्या फेरीत पहिली संधी शिरोळच्या जय महाराष्ट्र संघास मिळाली.

या संघाने सहा थर लावत प्रयत्न केला. गडहिंग्लजच्या जय हनुमान तालीम मंडळ या पथकानेही सहा थरांचा मनोरा रचला. गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकाने सात थर रचत हंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फेरीत गडहिंग्लजच्या नेताजी पालकर संघाने सहाव्या थरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला; तर तासगाव येथील शिवगर्जना पथकाने सात थर लावून हंडीपर्यंत पोहोचण्याची कसरत केली. सलामीपासूनच प्रेक्षकांतून गोविंदा पथकांना मिळणार्‍या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळाले.

पहिल्या फेरीत सहाही संघांना हंडी फोडता आली नाही. त्यामुळे साडेनऊ वाजता पुन्हा दुसर्‍या फेरीचा ड्रॉ काढण्यात आला. यावेळी हंडी आणखी दोन फुटांनी खाली घेण्यात आली. दुसर्‍या फेरीत पहिली संधी गडहिंग्लजच्या नेताजी पालकर व्यायामशाळा या पथकास मिळाली. या संधीचे सोने करीत या पथकाने हंडी फोडण्याचा निश्चय करूनच थर रचण्यास सुरुवात केली. धाकधूक आणि उत्साह अशा जल्लोषी वातावरणात प्रेक्षकांचे प्रोत्साहन आणि पथकातील गोविंदांच्या जिद्दीच्या जोरावर या गोविंदा पथकाने एका पाठोपाठ एक असे चार थर रचून त्यावर तीन गोविंदांनी चढाई करून अखेर हंडीवर काठी मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. हंडी फोडताच दसरा चौकात एकच जल्लोष झाला. गोविंदा पथकांतील गोविंदांसह प्रेक्षकांनी संगीताच्या तालावर ठेका धरला.

यावेळी खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. अण्णासाहेब जोल्ले, आ. शशिकला जोल्ले, माजी आ. अमल महाडिक, चंद्रदीप नरके, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन नाईक-निंबाळकर, राहुल देसाई, ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक, भागिरथी संस्थेच्या अरुंधती महाडिक, महेश जाधव, डॉ. अशोक माने, प्रशांत पोकळे, प्रकाश पोकळे, सुरेश पाटील, शिवराज पाटील, अक्षय काले, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.

मिरजकर तिकटीच्या 'निष्ठेच्या दहीहंडी'त रचले 8 थर

मिरजकर तिकटी येथे शिवसेना ठाकरे गटाने आयोजित केलेल्या 'निष्ठा दहीहंडी'त तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने 8 थर रचले. जिल्ह्यात असा विक्रम करणारे हे पहिलेच गोविंदा पथक ठरल्याचा दावा पथकाने केला. आठव्या थरावर देवराज धनवडे हा 14 वर्षांचा बालगोविंदा होता. सलामीनंतर त्याने केलेल्या नृत्यानेही उपस्थितांचे लक्ष वेधले.

SCROLL FOR NEXT