कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील ऐतिहासिक मणिकर्णिका कुंडाच्या संवर्धन कामाला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील 17 कोरीव कमानी पूर्ण करण्यात आल्या आहेत. सध्या कुंडाभोवतीच्या ओवर्यांवर कर्णशीळा बसवण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे कुंडाचे प्राचीन स्थापत्य आणि सौंदर्य अधिक उठावदार होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या स्वनिधीतून मणिकर्णिका कुंडासह गरुड मंडप आणि नगारखान्याच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. मणिकर्णिका कुंड संवर्धनासाठी देवस्थान समितीने 5 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामासाठी विशिष्ट प्रकारचे दगड घडवून पारंपरिक पद्धतीने कुंडाचे जतन केले जात आहे. कुंडाच्या पायर्या, ओवर्या आणि दगडी रचनेचा मूळ ढाचा कायम ठेवत उत्खननातून मिळालेल्या दगडांचा पुनर्वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
मणिकर्णिका कुंडाचे ऐतिहासिक महत्त्व
अंबाबाई मंदिरातील घाटी दरवाजालगत असलेले मणिकर्णिका कुंड 1957 मध्ये सार्वजनिक बागेसाठी महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा देवस्थान समितीकडे ताबा आल्यानंतर पुरातत्त्व विभागाकडे संवर्धनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मंजुरीनंतर उत्खननाचे काम हाती घेण्यात आले. उत्खननादरम्यान येथे लहान दगडी कुंड, पायर्या, ओवर्या, कोरीव कमानी, वीरगळ, शिवलिंग तसेच दगडी खांब अशा अनेक प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. या सर्वांचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे.