कोल्हापूर : मांगोरे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात पोतदार यांच्या घराचे नुकसान झाले.  
कोल्हापूर

Sasnenagar crime news | सासनेनगरात तक्रार मागे घेण्यासाठी मांगोरे गँगने तलवारीने काचा फोडल्या

पोतदार कुटुंबास जीवे मारण्याची धमकी; सहाजणांवर गुन्हा, दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आयटीआय वसतिगृहाच्या पिछाडीस असलेल्या सासनेनगरात मांगोरे गँगने मंगळवारी दुपारी तलवारीने पुन्हा दहशत माजवली. पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी विशाल मांगोरे (रा. पाचगांव) याच्यासह त्याच्या अन्य सहा ते आठ साथीदारांनी तलवारीने येथील सचिन पोतदार यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच संपूर्ण कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबतची फिर्याद श्रुतिका सचिन पोतदार (वय 28 रा. सासनेनगर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार विशाल मांगोरेसह सिध्देश भांदिगर (रा. जरगनगर), शाहरुख शेख, विराज मोहिते, आदीत्य दबडे व दोघा अनोळखींवर गुन्हा नोंद झाला आहे. विशाल मांगोरे व मोमीन याला पोलिसांनी अटक केली आहे.

सासनेनगर येथे वर्चस्व वादातून विशाल मांगोरे याने गेल्या दोन वर्षात वारंवार शस्त्राचा धाक दाखवत प्रचंड दहशत माजविली आहे. पोलिसांनी त्याच्यावर यापुर्वीही कारवाई केली आहे. पण दहशत माजविण्याचा प्रकार त्याच्याकडून सुरुच आहे. येथील रिकाम्या जागेत मांगोरे व त्याचे अन्य साथीदार मद्यप्राशन, गांजा सेवनासाठी येत होते. त्यांनी येथे दहशत निर्माण केली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. मध्यंतरी येथील नागरिकांनी याप्रकाराबाबात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी या टोळीवर अंकुश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मांगोरे याची कॉलनीतून धिंड काढली. पण जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्याकडून पुन्हा या परिसरात दहशत निर्माण करण्याचे प्रकार सुरुच आहेत.

मांगोरे याने 31 जानेवारी रोजीही पोतदार यांच्या घरावर हल्ला केला होता. मात्र यावेळी पोतदार कुटुंबिय घरामध्ये नसल्याने मांगोरे व त्याच्या साथीदारांनी दारामध्ये लावलेल्या दूचाकीची तोडफोड केली. यानंतर मंगळवारी (दि. 17) दुपारी चार वाजण्यासुमारास मांगोरे व त्याचे अन्य सात ते आठ साथीदार तोंडाला रुमाल बांधून हातामध्ये तलवार घेवून सासनेनगर येथे आले. त्यांनी तलवारीने पोतदार यांच्या घरावर हल्ला चढविला. घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्या अन्यथा संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकातील हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, अमर पाटील, प्रवीण सावंत यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी रात्री उशिरा शोध घेवून मांगोरे व त्याचा अन्य एका साथीदाराला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT