इचलकरंजी : माणगाव (ता. हातकणंगले) येथील जवान प्रीतम उपाध्ये हा हळदीच्या अंगानेच युद्धभूमीवर रवाना झाला. प्रीतम याचे लग्न 9 मे रोजी मोठ्या थाटामाटात पार पडले. घरात लगीनघाई सुरू असतानाच 10 मे रोजी सकाळी अचानक सुट्ट्या स्थगित करण्यात आल्या असून, तत्काळ सेवेत रुजू व्हावे लागेल, असा आदेश वरिष्ठांकडून आला. अजून हळदही वाळली नव्हती; पण तातडीने युद्धभूमीकडे रवाना झालेल्या या जवानाला नववधूनेही औक्षण करत निरोप दिला.
भारतीय सैन्यदलात असणार्या प्रीतम उपाध्ये या जवानाचे त्याच्या आई-वडिलांनी लग्न ठरविले. तोही खूश होता. गावी थाटामाटात लग्न झाले. अजून हळदही वाळली नव्हती. पै-पाहुणेही घरीच होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना अचानक पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थिती बदलली. मिळालेल्या संदेशामुळे जागतिक मातृ दिनाच्या पूर्वसंध्येलाच मातृभूमीसाठी प्रीतम युद्धभूमीकडे निघून गेला. त्याच्या या निर्णयासोबत पत्नी सृष्टी यांनीसुद्धा ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या आनंदापेक्षा युद्ध जिंकल्यानंतर देशवासीयांना होणारा आनंद महत्त्वाचा आहे, असे त्या ठामपणे सांगतात. त्यांच्या या निर्णयाचे सृष्टी यांच्या आई-वडिलांनीही स्वागतच केले.
प्रीतम हे 2012-13 साली हवाई दलात भरती झाले असून, चंदीगड, आग्रा या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. सध्या ते नाशिक या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांचे ते तीन वर्षांचे असतानाच निधन झाले असून, त्यांचे मामा जयकुमार उपाध्ये यांनी त्यांचे पालन-पोषण करून युद्ध वीराला घडविले आहे. प्रीतम यांच्या या कृतीचे रुकडी, माणगावसह पंचक्रोशीतून कौतुक होत असून, नव्या पिढीने त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.
ज्यावेळी प्रीतम उपाध्ये सीमेवर जाण्यासाठी सज्ज झाला, त्यावेळी त्याची दोन दिवसांपूर्वीच झालेली पत्नी सृष्टी यांनी त्याचे औक्षण केले. त्यांनी सांगितले, तुम्ही लढाई जिंकून या. आम्ही तुमची वाट पाहात आहे. या सर्व संवादामुळे उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले. अशा वीरपत्नी व सैनिकांमुळेच आपला भारत देश अभिमानास्पद गौरविला जातो.