कोल्हापूर : एका बाजूला शहरातील अनेक भागांत तीन दिवस पाण्याचा ठणठणाट, तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया गेल्याने महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मंगळवार पेठेतील ‘पाण्याचा खजिना’ येथील पाण्याची टाकी गुरुवारी रात्री साडेसहाच्या सुमारास ओव्हरफ्लो झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहून गेले. दोन तास पाणी वाहून जात होते.
गेल्या तीन दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पाण्याच्या एका थेंबासाठी नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत होती. उन्हाच्या तडाख्यात तासन्तास रांगेत उभे राहून पाणी मिळविण्याची वेळ नागरिकांवर आली होती. अशा परिस्थितीत डोळ्यांसमोर पाण्याची टाकी ओसंडून वाहताना पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तीन दिवस घागरभर पाण्यासाठी धावपळ करणाऱ्या नागरिकांना टाकीतून वाहून जाणारे पाणी पाहून हळहळ व्यक्त करावी लागली. ‘पाण्याची किंमत टंचाईच्या काळातच कळते’, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली.
टाकी ओव्हरफ्लो झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर यंत्रणेला जागे करून पाणी थांबविण्यात आले. काही नागरिक येथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टाकी ओव्हरफ्लो झाल्याचे सांगत गेले; पण ते कर्मचारी मोबाईलवर खेळण्यात मग्न होते. त्यांनी दुर्लक्ष केल्याने दोन तास पाणी वाहून जात होते. नंगीवली चौक, खरी कॉर्नर, वारे वसाहतीपर्यंतच्या रस्त्यावर त्यामुळे पाणीच पाणी झाले. एकीकडे शहरात अनेक भागात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया गेल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
गळतीतूनही पाणी वाया
शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या काही प्रमुख जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती आहे. वर्षानुवर्षे या गळती काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यातून हजारो लिटर पाणी वाया जाते. टंचाईच्या काळात या पाण्याचे महत्त्व सर्वांनाच कळते; पण गळती काढायलाही आता प्राधान्य देण्याची गरज आहे.