कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रातून मंगल कलश यात्रा उपक्रम सुरू केला आहे. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्र मंगल कलश यात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरून करण्यात आला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या मंगल कलश यात्रेला झेंडा दाखविला आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी यात्रा रवाना झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातून अशा सहा विभागीय मंगल कलश यात्रा काढण्यात येणार आहेत. त्या मुंबईतील जांबोरी मैदानावर महाराष्ट्रदिनी दि. 1 मे रोजी एकत्रित येणार आहेत. 1 मे ते 4 मे असा चार दिवसांचा ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव’ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
मंगल कलशात पवित्र जल व किल्ल्यांवरील मातीचे एकत्रीकरण शुक्रवारी सकाळी पन्हाळा येथील छत्रपती शिवरायांच्या मंदिरासमोरून पश्चिम महाराष्ट्र मंगल कलश यात्रा सुरू झाली. या मंगल कलश यात्रेत सजविलेल्या रथावर एक कलश ठेवण्यात आला असून, या कलशामध्ये त्या त्या भागातील पवित्र जल आणि किल्ल्यांच्या परिसरातील माती एकत्र करण्यात येणार आहे. हे मंगल कलश मुंबईत एकत्रित करण्यात येणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातून मंगल कलश यात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक पन्हाळगडावरून होत आहे. कोल्हापूरला हा मान मिळाला, याबद्दल आपल्याला आनंद होत असून, याला मिळालेला प्रतिसाद पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी यांनी मंगल कलश यात्रेदरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा इतिहास तरुणांसमोर मांडण्यात येणार असल्याचे सांगितले. माजी आमदार राजेश पाटील यांचेही भाषण झाले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी स्वागत केले. अनिल साळोखे, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, प्रा. किसन चौगले, नविद मुश्रीफ व रणजित पाटील, जिल्हा बँक संचालक भैया माने व रणवीर गायकवाड, ‘बिद्री’चे उपाध्यक्ष मनोज फराकटे, जि.प. माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, शहराध्यक्षा रेखा आवळे, आदिल फरास, विकास पाटील आदी उपस्थित होते. ही मंगल कलश यात्रा राजर्षी शाहू समाधिस्थळ, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, ताराराणी चौक येथे अभिवादन करून माणगावला मार्गस्थ झाली. अंबाबाई मंदिरात मंगल कलशाचे पूजन करण्यात आले.
जयसिंगपूर येथून मंगल कलश यात्रेने सांगली जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी जयसिंगपूर येथे हा मंगल कलश हसन मुश्रीफ यांनी आमदार इद्रीस नायकवडी, सांगली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कमलाकर जगदाळे, शहराध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला.