कागलमध्ये मंडलिक गटाची बॅनरबाजी file photo
कोल्हापूर

हसन साहेब, समरजितसिंह तुम्ही काय काय केलाय विसरणार नाही; मंडलिक गटाची बॅनरबाजी

पुढारी वृत्तसेवा
बा.ल. वंदुरकर

कागल : मुश्रीफ साहेब, आता जरा थांबा! असे म्हणत पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक अॅड. विरेंद्र मंडलिक यांनी यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. यानंतर मतदार संघातील गावागावातील प्रमुख चौकामध्ये मंडलिक गटाकडून अतिशय लक्षवेधी बॅनर लावण्यात आली आहेत. त्यामुळे कागल तालुक्यात खळबळ उडाली असून उलट सुलट राजकीय चर्चांना वेग आला आहे.

'हसनसाहेब, समरजितसिंह काय काय केलाय तुम्ही, हे विसरणार नाही आम्ही... कट्टर मंडलिक प्रेमी' अशा आशयाची बॅनर लावण्यात आली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर काहीसा शांत दिसणाऱ्या मंडलिक गटामध्ये सुरू असलेली खदखद अखेर बाहेर पडली असून मतदारसंघात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

विरेंद्र मंडलिक काय म्हणाले ?

हसनसाहेब कागल तालुक्यात तुमच्या विरोधात नकारात्मक वातावरण आहे. दहापैकी आठजण नव्या चेहर्‍याची मागणी करीत आहेत. महायुतीचा नवा चेहरा मी आहे. त्यामुळे मुश्रीफांनीच माझ्या उमेदवारीची घोषणा करावी व मंडलिकांच्या उपकाराची परतफेड करावी, अशी सनसनाटी मागणी विरेंद्र मंडलिक यांनी शेंदूर (ता. कागल) येथे शिवसेना पदाधिकारी नियुक्ती मेळाव्यात बोलताना केली. अॅड. विरेंद्र मंडलिक म्हणाले, हसनसाहेबांना उमेदवारी दिल्यास कागल तालुक्यातील अ‍ॅन्टिइन्कम्बंसीचा फटका महायुतीला बसण्याचा धोका आहे. कागल विधानसभेची जागा शिवसेनेचीच आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा अग्रहक्क आहे. त्यामुळेच माझी उमेदवारी महायुतीकडून प्रबळ आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क दौर्‍यात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लवकरच भेटून आपल्या उमेदवारीची मागणी करणार आहोत. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कागल विधानसभा मतदारसंघातील 121 गावांत आम्ही शिवसेनेचे भक्कम संघटन उभे केले आहे. त्या बळावर व गेली 60 वर्षे प्रत्येक गावात मंडलिक गट म्हणून उभी केलेली कार्यकर्त्यांची अभेद्य फळी या जोरावर महायुतीकडून आपण कागल विधानसभा निवडणुकीत नवा पर्याय व नवा बदल आणि नवा चेहरा म्हणून ताकदीनिशी उतरणार व लढणार आणि जिंकणारच असा आत्मविश्वास अ‍ॅड. मंडलिक यांनी व्यक्त केला.

विरेंद्र मंडलिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे खळबळ

या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संजय मंडलिक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच आमदार प्रकाश आबिटकर, युवा सेनेचे सचिव किरण साळवी उपस्थितीत राहणार होते. मात्र यापैकी कोणीही उपस्थित राहिलेले नव्हते. या मेळाव्यात केवळ विरेंद्र मंडलिक यांनी राजकीय भाषण देऊन कागल तालुक्याच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. त्यांच्या या राजकीय भूमिकेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून सुरू असलेल्या राजकीय हालचालीमध्ये खासदार संजय मंडलिक गट शांत वाटत होता. कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आलेली नव्हती. मात्र वेगवेगळ्या कार्यक्रमात माजी खासदार संजय मंडलिक यांनी आपण युती बरोबरच आहोत, असे स्पष्ट केले होते. मात्र विरेंद्र मंडलिक यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

कागलच्या राजकारणात नवा ट्विस्ट

माजी आमदार संजय घाडगे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या एकत्रित कार्यक्रमाला माजी खासदार संजय मंडलिक यांनी अनेक ठिकाणी टाळल्यामुळे याची देखील गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जशी भूमिका विरेंद्र मंडलिक यांनी घेतली, तशीच भूमिका शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांच्या बाबतही घेतली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा कागलच्या राजकारणात नवा ट्विस्ट कोणता येतो याची सध्या चर्चा सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT