Bungalow robbery case | दारूपार्टी अन् चैनीसाठी मित्रांच्या मदतीने स्वत:चाच फोडला बंगला 
कोल्हापूर

Bungalow robbery case | दारूपार्टी अन् चैनीसाठी मित्रांच्या मदतीने स्वत:चाच फोडला बंगला

पाडळी खुर्द येथील प्रकार; सराईताला अटक : सूत्रधारासह साथीदार पसार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दारूच्या पार्टीसह चैनीसाठी मित्रांच्या मदतीने पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील स्वत:च्या मालकीचा बंगला फोडून 15 लाख 58 हजार रुपये किमतीचे सोन्याचे 12 तोळे दागिने, रोकड, महागड्या वस्तू लंपास केल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी उघडकीला आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सिद्धार्थ संजय भालकर (वय 23, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) याला बेड्या ठोकून 12 तोळे दागिने हस्तगत केले.

मुख्य सूत्रधार केदार शंकर पाटील (22, रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) व त्याचा साथीदार दीक्षित फरार असून पोलिस शोध घेत आहेत. करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, भालकरचा करवीर पोलिसांकडे ताबा देण्यात आला आहे. मुख्य संशयित केदार, सिद्धार्थ व दीक्षित एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. कामधंदा न करता उनाडक्या करणे, दारू पार्ट्यांसह चैनी करणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. चैनीसाठी केदार पाटील याने मित्रांच्या मदतीने स्वत:चा बंगला फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्याचा कट आखला.

संधी साधली अन् बंगला फोडला

संशयित केदार वगळता घरातील सर्वच 6 मे रोजी कोकण दर्शनासाठी गेले होते. ही संधी साधून केदारने स्वत:चा बंगला फोडून दागिने, रोकड, महाग वस्तू लंपास केल्या. चोरीचा ऐवज साथीदार सिद्धार्थ भालकर, दीक्षित याच्याकडे विक्रीसाठी सोपविला.

त्रिकुटाच्या कारनाम्याचा भांडाफोड

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, वैभव पाटीलसह पथकाला सुगावा लागला. दागिने विक्रीसाठी जाताना सिद्धार्थला हॉकी स्टेडियमजवळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्रिकुटाच्या कारनाम्याचा भांडाफोड झाला. मुख्य सूत्रधार केदार पाटीलसह साथीदारांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT