कोल्हापूर : ‘मी गुंडांच्या गँगमधला, माझ्या नादाला लागू नका’ अशी धमकी देत धारदार कोयत्याच्या धाकाने फुलेवाडी येथील अपार्टमेंटमधील रहिवाशांवर दहशत माजवणार्या संशयिताला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले. ओमकेश उमेश आलमेलेकर (वय 42, रा. गुरूप्रसाद अपार्टमेंट, इंगवलेनगर) असे त्याचे नाव आहे. संशयितावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.
आलमेलेकर राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये काही दिवसांपासून रहिवाशांवर दहशत माजवित आहे. कचरा विस्कटणे, अंगावर पाणी टाकणे, जिन्यात झोपणे, शेजार्यांशी वादावादी करून त्यांच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार सुरू आहेत. रविवारी सकाळी तर त्याने कमालच केली. हातात धारदार कोयता घेऊन त्याने ‘मैं हू डॉन... डॉन...’ असे बरळत त्याने जिन्याच्या स्टीलच्या रेलिंगवर कोयता फिरवला.
वारंवारच्या कृत्यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मी गुंडांच्या गँगमध्ये काम करतो. माझ्या नादाला लागू नका, अन्यथा... अशी धमकी दिली. शिवीगाळही केली. रहिवाशांनी सायंकाळी करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडली. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.