Jewellery Theft Case | पाहुण्याच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या कर्नाटकातील एकास अटक 
कोल्हापूर

Jewellery Theft Case | पाहुण्याच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या कर्नाटकातील एकास अटक

कोल्हापुरातील खाटीक गल्लीतील चोरीचा अखेर छडा; १८ लाखांचे दागिने जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रविवारपेठ, खाटीक गल्ली येथील इम्तियाज खाटीक यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी येऊन त्यांच्याच घरातून १८ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या कर्नाटकातील पाहुण्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आशपाक ख्वाजासाब राठी (वय ३८, रा. कसाई गल्ली, शहापूर, बेळगाव) असे त्याचे नाव आहे.

मध्यवर्ती रविवारपेठ येथील इम्तियाज खाटीक यांच्या आईचे २२ एप्रिलला मध्यरात्री निधन झाले. दफनविधीसाठी खाटीक कुटुंबीय, शहर परिसरासह कर्नाटकातील नातेवाईक येथील खाटीक गल्लीत दाखल झाले होते. संशयित आशफाकसाठी हा कर्नाटकातून आला होता. यादिवशी सकाळी १०.१५ ते दुपारी १२.३० वाजता खाटीक यांच्या मृत आईचा पार्थिव घरासमोरील अंगणात ठेऊन धार्मिक विधी करण्यात येत होते. नातेवाईक अत्यंदर्शन घेत असताना संशयित राठी नजर चुकवून बंगल्यात घुसला.

इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील खोलीत जाऊन साहित्याची शोधाशोध करू लागला. कपाटात ठेवलेल्या १२ तोळ्यांचे दागिने त्याच्या हाती लागले. दागिने घेऊन तो पसार झाला. काही वेळाने घरातील दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारल्याचे निदर्शनास आल्यानंतर खाटीक कुटुंबीय, नातेवाईकांना धक्का बसला. पोलिसही चक्रावले. पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर, उपनिरीक्षक मयुश्वरी खरात, मंगेश मानेसह पथकाने चोरीचा छडा लावून कर्नाटकातील चोरट्याला बेड्या ठोकल्या.

चोरट्याने चोरीचे दागिने वितळवून त्याची लगडी केली होती. पथकाने लगडी जप्त केली आहे. न्यायालयाने त्यास ८ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. संशयिताने कर्नाटकातही नातेवाईकांच्या घरात चोरी केल्याचा संशय असल्याचे तपासाधिकारी कण्हेरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT