शिरोली पुलाची: शियेपैकी श्रीरामनगर येथील बाबासो इंगवले यांनी गुरुवारी (दि.25) विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी (दि.२६) मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बाबासो हे शिरोली एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे नाईट शिफ्ट करून बाबासो इंगवले हे घरी आले. घरी आल्यानंतर शेतात तननाशक फवारणीसाठी शेतात जात असल्याचे पत्नीला सांगून घरातून बाहेर पडले. काही वेळानंतर पत्नीने पती बाबासो यांचा मोबाईल स्टेटस पाहिल्यानंतर पतीने विष प्राशन केल्याचे कळाले. नातेवाईकांनी तत्काळ शेतात धाव घेतली.
शेतात पोहचताच बाबासो इंगवले हे बांधावरती विष प्राशन करून पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून त्याच्यावरती उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (दि.२६) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात शेतीवाद व आर्थिक देवाण-घेवाणीवरून इंगवले हे घरात वाद करत असल्याचं त्यांच्या कुटुंबातून सांगण्यात आला आहे. मोबाईलवर स्टेटस ठेवून कुटुंबातील भावंडांचे नाव टाकून त्यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे त्यांनी म्हटले होते.