कोल्हापूर : न्यायालयीन परिक्षेत्रात सुरक्षिततेच्या द़ृष्टीने अग्निशस्त्रांसह ज्वालाग्रही पदार्थ, वस्तू बाळगण्यास मनाई असतानाही रिव्हॉल्व्हर कब्जात बाळगून कोर्ट आवारात प्रवेश करणार्या वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील सुरेश संभाजी नरके (वय 42) यास शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. संशयिताकडून दीड लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आले आहे. कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुल आवारात सोमवारी सकाळी ही घटना घडली.
जिल्हा संकुल आवारात बंदोबस्तासाठी नियुक्त असलेले कॉन्स्टेबल संजय पारळे यांनी संशयिताविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयिताकडे कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, न्यायालयीन परिक्षेत्रात सुरक्षिततेच्या द़ृष्टीने अग्निशस्त्र, जिवंत राऊंड, ज्वालाग्रही पदार्थ, वस्तू कब्जात बाळगण्यास मनाई असतानाही संशयिताने लोकांच्या जीवितास हानी पोहोचवणे व न्यायालयीन सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या हेतूने प्रयत्न केला आहे. शस्त्र परवान्याच्या शर्ती-अटी व नियमांचे उल्लंघन केले आहे.
सोमवारी सकाळी 11.40 वाजता न्यायसंकुलातील तिसर्या मजल्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे हे डायसवर उपस्थित असताना, तसेच फिर्यादी पारळे कोर्टाच्या बाहेर ड्युटीवर कार्यरत असताना, संशयित सुरेश नरके रिव्हॉल्व्हरसह कोर्ट आवारात वावरत असल्याचे निदर्शनास आले. पारळे यांनी तत्काळ सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. रिव्हॉल्व्हरसह संशयिताला शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे डोके यांनी सांगितले.