कोल्हापूर : मोटारीची किल्ली लपवून ठेवल्याच्या मस्करीतून उद्भवलेल्या भांडणात कोयत्याने झालेल्या हल्ल्यात अविनाश अभिमान फडके (वय 38, रा. जयहिंद कॉलनी, कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा, ता. करवीर) गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सागर जालिंदर सोनवणे, यश सोनवणे, वीर सोनवणे (रा. निळा चौक, कळंबा) यांच्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कळंबा - वाशी रोडवर पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. यावेळी झालेल्या झटापटीत संशयित सागर सोनवणेही जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अविनाश फडके व संशयित सोनवणे एकमेकांचे मित्र आहेत. मोटारीची किल्ली लपवून ठेवल्याच्या कारणातून दोघांत बाचाबाची झाली. फडके किल्ली आणण्यासाठी सोनवणे याच्या घरी गेले असता त्यांच्यात वादावादी, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. सागर सोनवणेसह त्याची मुले यश व वीर हे अंगावर धावून गेले.
यावेळी कोयत्याने झालेल्या हल्ल्यात अविनाश फडके गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सागर सोनवणेसह त्याच्या दोन्ही मुलांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.