कोल्हापूर : सूरज साखरे याच्यावर गोळ्या झाडून त्याच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या सराईत टोळीला पिस्तूल, जिवंत काडतुसे पुरविणाऱ्या जयसिंगपूर येथील तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी तावडे हॉटेल परिसरात जेरबंद केले. सतीश मुुकुंद पवार (वय ३७, रा. कोल्हापूर रस्ता, जयसिंगपूर) असे त्याचे नाव आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर संशयित पवार पसार झाला होता.
पूर्ववैमनस्य, वर्चस्ववादातून साखरे याच्यावर वाशी नाका ते फुलेवाडी रिंगरोड मॉलजवळ शरयू अपार्टमेंटसमोर दोन अनोळखी तरुणांनी दि. १६ जुलैला भरदिवसा जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळ्या झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत साखरे गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी सराईत गुन्हेगार रफिक ऊर्फ देवा मुल्ला, राकेश कारंडे यांना पोलिसांनी अटक केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या चौकशीत सूत्रधार गणेश खाडे यानेे या टोळीला साखरे याच्या हत्येची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खाडेसह ६ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.
साखरेच्या हत्येसाठी टोळीला पिस्तूल, काडतुसे पुरविणाऱ्या जयसिंगपूर येथील सतीश पवार याचे नाव निष्पन्न होताच तो पसार झाला होता. पथकाने त्याच्या घरावर छापा टाकून झडतीही घेतली होती. मात्र तो सापडला नव्हता. संशयित पवार तावडे हॉटेल परिसरात येणार असल्याची बातमी मिळताच पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, हवालदार वैभव पाटीलसह पथकाने सापळा रचून त्याला जेरबंद केले. फरार काळातील त्याच्या वास्तव्यासह आश्रयदात्याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.