कोल्हापूर : भरदिवसा वाहनांची चोरी करून त्यांची अवघ्या पंधरा-वीस हजारांमध्ये विक्री केल्याच्या आरोपावरून कोरोची (ता. हातकणंगले) येथील नागेश हणमंत शिंदे (वय 30) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी अटक केली. कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी 120 पेक्षा जादा गुन्हे दाखल आहेत. संशयिताकडून राजारामपुरीसह पंढरपूर व सांगोला येथील वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीला आले आहेत.
8 लाख 60 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. संशयित नागेश शिंदे याने राजारामपुरीतून दुचाकी चोरली होती. ती विकण्यासाठी तो गोकुळ शिरगावला आला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चारचाकी व दुचाकीच्या गुन्ह्यांची त्याने कबुली दिली. त्याला राजारामपुरी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
जानेवारी 2025 मध्ये याच संशयिताला अटक करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीला आणले होते. कारागृहातून जामिनावर सुटका होताच कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत त्याने पुन्हा चारचाकी व महागड्या दुचाकी चोरल्या असून, त्या जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.