इचलकरंजी : ‘आयपीएल’च्या मुंबई-राजस्थान या सामन्याच्या रणधुमाळीत मोठी उलाढाल करणार्या ऑनलाईन सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील भुवनेश्वरी मंदिराजवळ मनीषा एंटरप्राईजेस या फुटवेअरच्या गोदामावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अमेय विलास बडवे (वय 32) आणि अभिजित विलास बडवे (30, दोघे रा. प्रियदर्शनी कॉलनी) या दोघा भावांसह त्यांचे साथीदार गणेश प्रकाश पाटील (27, रा. मुरदंडे मळा), उत्तमसिंग प्रतापसिंग बग्गा (38, रा. गणेशनगर), याकूब अब्दुल मुजावर (47, रा. गावभाग), रिषभ उमेश पाटील (रा. जवाहरनगर) या 6 जणांना अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वेबसाईट आणि अॅपद्वारे हे रॅकेट हायटेक पद्धतीने सुरू होते. याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली.
‘आयपीएल’च्या मॅचवर सट्टेबाजीचे मोठे रॅकेट सुरू असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक जाधव यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार शहापूर, वडगाव तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आदींसह पोलिसांच्या संयुक्त पथकाने अमेय बडवे याच्या फुटवेअर गोदामावर छापा टाकला. यावेळी मुंबई-राजस्थान सामन्यावर काहीजण बेटिंग घेताना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी 4.20 लाखांचे 9 मोबाईल, 15 हजारांचा लॅपटॉप, 70 हजार 230 रुपये रोख, 54 लाखांच्या 3 आलिशान गाड्या असा सुमारे 59 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याची फिर्याद उपनिरीक्षक महावीर कुटे यांनी दिली आहे.
राजस्थान कनेक्शन
क्रिकेट बेटिंगप्रकरणी शहरात झालेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. दुपारपासून सुरू झालेली कारवाईची मोहीम पहाटेपर्यंत सुरू होती. तपासात तब्बल 100 हून अधिक जण रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचे राजस्थान कनेक्शनही समोर आले असून, तिथून सूत्रे हलत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.