नागाव/शिरोली पुलाची : कोल्हापूर-सांगली राज्य महामार्गावर असलेल्या मार्बल लाईनमधील ‘रिगल सिरॅमिक्स’ या दुकानाच्या गोदामाला अचानक आग लागून गोदामातील 80 लाखांहून अधिक महागडे सिरॅमिक्स साहित्याचे नुकसान झाले.
अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, तर या आगीची तीव—ता पाहून महावितरणच्या कर्मचार्यांनी वेळीच वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सायंकाळी 7.30 च्या सुमारास मार्बल लाईन येथील सर्व दुकाने बंद करून मालक व कामगार सुट्टी करून घरी जातात हा त्यांचा नेहमीचाच दिनक्रम असल्याने नेहमीप्रमाणे रिगल सिरॅमिक्सचेही दुकान बंद करून मालक राजन जालावडिया व कामगार घरी जात होते; पण दुकानाच्या मागील बाजूस मोठे गोदाम असून, या गोदामातून मागील बाजूने धुराचे लोट व सिरॅमिक्स फुटत असल्याचे आवाज बाहेर येऊ लागले, हे शेजारी असणारे वॉचमन राजेंद्र काळे यांनी पाहिले त्यांनी पुढे जावून सर्व प्रकार दुकान मालकास सांगितला. मालकाने गोदामाकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; पण आग आटोक्यात येत नव्हती. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. गोदामात सिरॅमिक्सच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात पॅकिंगचे साहित्य असल्याने आग झपाट्याने पसरली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी वीज कर्मचार्यांनीही वीजपुरवठा बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.