इचलकरंजी : येथील अयोध्या कॉलनीतील बंगल्याचे कुलूप तोडून 38 हजारांची रोकड, 15.5 तोळ्यांचे सोन्याचे आणि 700 ग्रॅम चांदीचे दागिने लंपास केले. शुक्रवारी मध्यरात्री घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरट्यांनी तब्बल 12 लाख 92 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले. श्वानाने घरामागील उद्यानातून कलानगरपर्यंत चोरट्यांचा माग काढला.
याप्रकरणी विमलादेवी शंभुनाथ केसरवाणी (वय 53) यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. अयोध्या कॉलनी परिसरात शंभुनाथ केसरवाणी यांचा ‘श्री दत्त निवास’ बंगला आहे. केसरवाणी कुटुंबीय दहा दिवसांपासून पुणे येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले आहे. शनिवारी सकाळी नातेवाईकांना केसरवाणी यांच्या बंगल्याचे कुलूप तुटलेल्या स्थितीत निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत केसरवाणी यांना माहिती दिली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन संशयित या भागात फिरताना दिसले. त्यांनी कटावणीने बंगल्याच्या मुख्य दरवाजासह बेडरूम आणि एका खोलीचे कुलूप तोडून कपाट, बेडमधील साहित्य विस्कटले. मौल्यवान साहित्य बॅगांमध्ये भरून पहाटेच्या सुमारास दरवाजातून चोरटे पसार झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.