कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत महायुतीची उमेदवार यादी अधिकृतपणे जाहीर झालेली नसली तरी सर्वपक्षीय बंडखोरीचा वणवा भडकला आहे. यामध्ये शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपला सर्वाधिक झळ बसली आहे. भाजपच्या एका इच्छुक महीला उमेदवारांने तर मंगळवारी थेट पक्ष कार्यालयासमोरच आत्मदहनाचा इशारा दिला आहे; तर काही पदाधिकार्यांना भाजपचे फलक उतरवून ते कार्यालयात जमा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील दोन उमेदवारांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेसची उमेदवारी मिळविली आहे.
प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपकडून इच्छुक असणार्या पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या श्रीमती धनश्री तोडकर यांनी उमेदवारी नाकारल्याने मंगळवारी थेट पक्षाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इषारा दिला आहे. तोडकर यांच्या उमेदवारीसाठी एका वजनदार माजी केंद्रीय मंत्र्यांनी फोन केला असल्याची चर्चा आहे. दरम्यान आम्ही किती अन्याय सहन करायचा, असा सवाल करत गणेश देसाई या भाजपच्या कार्यकर्त्यांने थेट नेत्यांचे डोके आणि गाडी फोडण्याचा तसेच भाजपचे फलक कटरने तोडून कार्यालयाबाहेर वाजत-गाजत आणून ठेवण्याचा इशारा दिला आहे.
उमेदवारी डावललेल्या काही महिला कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात दंड थोपटून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेनेतही राहुल चव्हाण यांनी उमेदवारी नाकारल्याने बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या तेजस्विनी घोरपडे, महेंद्र चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसने त्यांना उमेदवारी देत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सन्मान राखला आहे.
काँग्रेसचे निष्ठावंत माजी नगरसेवक अशोक जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान काँग्रेसचा आणखी एक माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. मात्र ही केवळ चर्चाच राहिली; तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शरद पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे. त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे.