MPSC Result : गरिबीवर मात करत तेरवाडच्या महेश साळुंखे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी झेप Pudhari
कोल्हापूर

MPSC Result : गरिबीवर मात करत तेरवाडच्या महेश साळुंखे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी झेप

वडील सलूनमध्ये कामगार, आई ऊस रोपवाटिकेत मजूर; मुलाच्या यशाचा आनंद साखर-पेढे वाटून साजरा

Suraj Kamble

कुरुंदवाड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत तेरवाड (ता. शिरोळ) येथील महेश दिलीप साळुंखे यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी पात्र ठरत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या महेशच्या या यशामुळे तेरवाड व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महेश साळुंखे यांनी तेरवाड येथील आश्रम शाळेतून आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. त्यांचे वडील दिलीप साळुंखे हे गावातील सलूनच्या दुकानात कामगार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई ऊस रोपवाटिकेत मजुरीचे काम करते.

घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे महेश यांनी शिक्षणाबरोबर मिळेल ते काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावला. कामानंतर उरलेल्या वेळेत अभ्यास करत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. मर्यादित साधनसामग्री, आर्थिक अडचणी आणि कुटुंबीयांची जबाबदारी असूनही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर आपले ध्येय गाठले.

अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. मुलाने मोठे यश संपादन केल्याचा अभिमान वाटल्याने वडील दिलीप साळुंखे यांनी तेरवाड तसेच लाल नगर परिसरात साखर-पेढे वाटून आनंद साजरा केला. साध्या कुटुंबातून आलेल्या महेश साळुंखे यांच्या या यशामुळे तेरवाड गावाचा नावलौकिक वाढला असून त्यांच्या यशाने परिसरातील तरुणांना प्रेरणा मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT