चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : यापूर्वी कधी नव्हे एवढ्या ताकदीने राजकीय पक्षांनी लढविलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे. मात्र काँग्रेसने ज्या चिवटपणे महायुतीशी कडवी झुंज दिली, त्यातून महापालिकेच्या राजकारणात आपणच दादा असल्याचे सिद्ध केले आहे. काँग्रेसने एकहाती निवडणूक लढवून मिळविलेले यश घवघवीत आहे. जनसुराज्य व ठाकरे शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे; तर शरद पवार राष्ट्रवादीला आपल्याच पक्षाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. एकेकाळच्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने ताकदीने कमळ फुलविले आहे; तर शिवसेनेकडून अजून मोठ्या यशाची अपेक्षा होती. मात्र त्यांची ताकद वाढली आहे. आजवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदाच महायुतीचा भगवा फडकणार आहे.
आघाडीच्या राजकारणापासून महापालिकेला पक्षीय वळण लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनी ताकद लावलेली ही पहिलीच निवडणूक म्हणावी लागेल. कारण या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट प्रचारात सहभाग घेतला. खरे तर भाजपला फार वर्षांपासून कोल्हापूरवर वर्चस्व हवे आहे. अनेक नेत्यांनी ते बोलूनही दाखविले आहे. पण स्थानिक कार्यकर्त्यांची मर्यादित ताकद असल्याने आपल्याला हवे तसे काम करता येत नसल्याची खंत भाजपच्या नेत्यांनी बोलून दाखविली होती. आता त्याला फळ आले आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष महायुती म्हणून सत्ता स्थापन करतील.
पूर्वीच्या काळात आघाड्यांचे राजकारण चालत असे, तेव्हाही त्याचे नेतृत्व करणारे महादेवराव महाडिक हे कोल्हापूरचा महापौर काँग्रेसचा असल्याचे आवर्जून सांगत. विशेषत: नव्या पदाधिकार्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट असेल तेव्हा तरी अगदी पक्षाची आठवण काढली जात असे. मात्र सतेज पाटील यांनी मंत्री झाल्यानंतर पक्षाच्या राजकारणाशिवाय महापालिकेतील बाजार थांबणार नाही, असे म्हणत पक्षीय पातळीवरील राजकारणाला आकार दिला. त्याही काळात कोल्हापूर महापालिकेत कुठेही अस्तित्वात नसलेली महाविकास आघाडी सत्तेत होती. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा समावेश होता.
2014 नंतरच्या देशातील राजकीय परिवर्तनाच्या लाटेने कोल्हापुरात एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सदस्य असणार्या भाजपला ताकद मिळवून दिली. मोदी लाटेने देशभर परिवर्तन आणले. कोल्हापूरच्या भाजपला कधी नव्हे ते 13 जागांवर महापालिकेत यश मिळाले. महापालिकेत भाजपचा दबदबा निर्माण झाला. त्याला महाडिक यांच्या ताराराणी आघाडीची साथ मिळाली. पुढे महाडिक गटाचा भाजपमध्ये प्रवेश झाला. आता भाजपला मिळालेले घवघवीत यश ही दोन्हीची एकत्रित ताकद आहे. महापालिकेत सत्ता महायुतीची येईल, पण आव्हानेही आहेत. त्याचबरोबर कारभार करताना काँग्रेस महापालिका सभागृहात दादा असेल हे विसरता येणार नाही.
सतेज पाटील यांचे एकहाती यश
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी शब्दश: एकहाती खिंड लढविली. 81 प्रभागांत 74 उमेदवार उभे करून त्यांना ताकद देत प्रचाराची धुरा सांभाळात रात्रीचा दिवस करत सतेज पाटील यांनी मिळविलेल्या यशातून सत्ता मिळाली नसली तरी महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसच दादा असल्याचे दाखवून दिले. महायुतीच्या तुलनेत काँग्रेसने एकहाती मिळविलेले यश हे प्रभावी आहे.अनेक नेते विरुद्ध एक नेता अशा लढाईत सतेज पाटील यांनी यश मिळविले आहे. विसर्जित महापालिकेत काँग्रेसचे 27 सदस्य होते; तर आता ही संख्या 34 वर पोहोचली हे मोठे यश आहे.
मोठ्या यशाची अपेक्षा होती
विसर्जित महापालिकेत भाजपचे 13 व महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचे 19 मिळून 32 नगरसेवक होते. तेव्हा शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपच्या विरोधात होते. मात्र महाडिक आता भाजपात आहेत; तर शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजपबरोबर आहेत. शिवसेनेचे 4 व राष्ट्रवादीचे 14 सदस्य विसर्जित महापालिकेत सदस्य होते. ते पाहता महायुतीला महापालिकेत फार मोठे संख्याबळ गाठता आलेले नाही.