इचलकरंजी : महापालिकेच्या निवडणुकीसाठी 230 उमेदवार रिंगणात उतरले होते. महायुती आणि शिव-शाहू विकास आघाडी यामध्येच तुल्यबळ लढत होती. मात्र महायुतीने 47 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व राखले. यामध्ये एकट्या भाजपने 43 जागा जिंकत आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले. शिव-शाहू विकास आघाडीला केवळ 17 जागा मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाने एक जागा जिंकली. परिवर्तन आघाडी आणि 50 हून अधिक अपक्षांनीही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पदरीही निराशाच आली.
इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक होत असल्याने इच्छुक उमेदवारांची प्रचंड भाऊगर्दी झाली होती. विशेषत: भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्यांना काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याची वेळ आली. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मँचेस्टर आघाडी, स्वाभिमानी, मनसे आदी पक्षांनी एकत्र येत शिव-शाहू विकास आघाडीचा पर्याय निवडला. परिणामी अनेक राष्ट्रीय पक्षांचे चिन्हच या निवडणुकीत गायब झाले.
भाजपने 57 जागा लढवल्या. त्यापैकी 43 जागांवर त्यांनी विजय मिळवला. मात्र 14 जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यामध्ये माजी नगरसेवक सुनील पाटील, संजय केंगार, माजी नगरसेविका, शुभांगी माळी, मंगल मुसळे यांना पराभव स्वीकारावा लागला. माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, तानाजी पोवार, माजी सभापती किरण खवरे, विठ्ठल चोपडे, राजू बोंद्रे, चंद्रकांत शेळके, प्रमिला जावळे, माजी नगरसेविका सारिका पाटील, तेजश्री भोसले, जुलेखा पटेकरी, ध—ुवती दळवाई, माजी नगरसेवक नितेश पोवार, संतोष शेळके, मनोज हिंगमिरे यांनी पुन्हा बाजी मारत महापालिकेच्या पहिल्या सभागृहात प्रवेश केला आहे.
शिवसेना शिंदे गटाने दहा जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 3 जागांवर त्यांना विजय मिळवता आला. त्यामध्ये माजी नगरसेवक रवींद्र माने, सरिता आवळे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 9 जागा लढवल्या होत्या. मात्र अशोकराव जांभळे यांच्या रुपाने एकमेव जागा राखण्यात त्यांना यश आले. शिवसेना उबाठा गटाने शिवाजी पाटील यांच्या रुपाने एक नगरसेवक विजयी झाला.
शिव-शाहू विकास आघाडीने तब्बल 65 जागा लढवल्या होत्या. यामध्ये 17 जागांवर त्यांना यश मिळाले. मात्र 48 जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, माजी सभापती उदयसिंग पाटील, संजय तेलनाडे, रुपाली कोकणे, माजी नगरसेवक मदन कारंडे, सयाजी चव्हाण, सुनील तेलनाडे, अमर जाधव, माजी नगरसेविका संगीता आलासे यांनी पुन्हा विजय संपादन केला आहे.
अपक्षांच्या पदरी अपयश
या निवडणुकीत तब्बल 59 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये माजी नगरसेवक मोहन कुंभार, सायली लायकर, माधुरी चव्हाण आदींचा समावेश होता. त्या प्रभागात त्यांचा मोठा इम्पॅक्ट ठरेल अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात 59 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले असले तरी एकही उमेदवार विजयापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे या निवडणुकीत अपक्षांकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.