kolhapur | सत्तेमध्ये एकी मात्र मैदानात बेकी! Pudhari
कोल्हापूर

kolhapur | सत्तेमध्ये एकी मात्र मैदानात बेकी!

मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली खडाखडी; महायुतीसाठी स्वबळाचा नारा फायद्याचा की तोट्याचा?

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकजुटीने ताकद दाखवणार्‍या महायुतीची वज्रमूठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र ढिली झालेली दिसत आहे. जागावाटपातील पेच आणि स्थानिक गटातटाच्या राजकारणामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीमधील घटक पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन त्याला मैत्रीपूर्ण लढत, असे गोंडस नाव दिले. प्रत्यक्षात मात्र महायुतीमध्येच खडाखडी दिसून येत आहे.

नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढविण्यात आल्या. त्यामध्ये चांगले यशही आले. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल, असे वाटत होते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे वेगळी आहेत. कोल्हापुरात गटातटाच्या राजकारणाची मुळे खोलवर रुजलेली असल्याने पहिल्याच बैठकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांचे एकमत होऊ शकले नाही. परिणामी, जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण असा फॉर्म्युला ठरला, मात्र प्रचारात हा सुसंवाद दिसून आला नसल्याचे चित्र आहे.

काँग्रेसची कासव चाल

महायुतीमधील या फाटाफुटीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस शांतपणे आणि रणनीती आखून आपली पावले टाकत आहे. जिल्ह्यातील या राजकीय खिचडीमुळे महायुतीच्या मतांचे विभाजन अटळ मानले जात आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा हा प्रयोग महायुतीला जिल्ह्यात अधिक जागा मिळवून देणार की अंतर्गत संघर्षामुळे विरोधकांच्या पथ्यावर पडणार, याचे उत्तर निकालानंतरच स्पष्ट होईल.

करवीरमध्ये महायुतीची प्रतिष्ठा

काँग्रसेचा बालेकिल्ला, परंतु आता भाजपने आपला प्रभाव निर्माण केला आहे. या तालुक्यात देखील महायुतीतील घटक पक्षाचे उमेदवार काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढतीच्या फॉर्म्युल्याने महायुतीला बळ मिळणार की, फटका बसणार की, याचा लाभ विरोधकांना होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

राधानगरी-भुदरगड टोकाचा संघर्ष

पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक. गेल्या तीन विधानसभा निवडणुका या दोघांमध्येच झाल्या. दरम्यान, राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे हे दोघे नेते महायुतीमध्ये आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

कागलात जोरदार कुस्ती

आदल्या रात्री खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नेते दुसर्‍या दिवशी मांडीला मांडी लावून बसतील आणि गळ्यात गळे घालून फोटो काढून घेतील, असले राजकारण कागल तालुक्यात पाहावयास मिळते. येथे मुश्रीफ व घाटगे गट एकत्र असले तरी संजय मंडलिक यांनी विरोधात शड्डू ठोकला असल्याने येथील राजकीय कुस्ती जोरदार होणार असल्याची शक्यता आहे.

चंदगडमध्ये महायुतीला तडा

अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवाजी पाटील यांनी विधानसभेला राजेश पाटील यांचा पराभव केला. आज दोघे महायुतीचे घटक आहेत; परंतु जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी वेगवेगळे मार्ग स्वीकारले आहेत.

शाहूवाडी-पन्हाळ्यात पारंपरिक लढत

येथे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचीही काही गटापुरती ताकद आहे. याठिकाणी दोघे एकमेकांच्या विरोधात लढत आहे. याशिवाय काही ठिकाणी भाजपचे उमेदवार देखील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विरोधात उभे केले आहेत.

आजर्‍यात सोयीचे राजकारण

येथे पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सोयीच्या आघाड्या केल्या आहेत.

गगनबावड्यात दुरंगी लढत

गगनबावडा तालुक्यात केवळ दोनच जागा असल्यामुळे याठिकाणी काँग्रेस व महायुती अशी थेट लढत होत आहे.

हातकणंगलेत वर्चस्वाची लढाई

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजप आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने महायुतीच्या मतांची विभागणी होण्याची भीती आहे.

गडहिंग्लजमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

राज्यात विरोधात असले तरी गडहिंग्लजमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने हातमिळवणी केली आहे.

शिरोळमध्ये आघाड्यांचे राजकारण

शिरोळमध्ये शिवसेनेचे आमदार असले तरी त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीवरच भर असतो. नगरपालिकेत देखील त्यांनी आघाडी केली होती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले आहे. त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसने देखील स्वाभिमानी व समविचारींना सोबत घेऊन याठिकाणी एकत्र केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT