जयसिंगपूर : महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात महायुतीचे नेते एकत्र झाले आहेत. रविवारी रात्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. प्राथमिक टप्प्यात भाजप, यड्रावकर गट, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिलाने लढण्याचा निर्णय घेतला असला तरी दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान सर्वांनीच चिन्हाचा आग्रह सोडून स्थानिक पातळीवरील राजकीय संदर्भांचा विचार करून लढण्यावर चर्चा झाल्याचे समजते.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी आमदार यड्रावकर यांची भेट घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा केली. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी पक्षांनी एकत्रितपणे लढण्यावर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील राजकीय संदर्भाची यड्रावकर यांनी माहिती दिली. एकत्रित लढण्यावर एकमत असले तरी चिन्हावरच लढण्याचे अद्याप दोन दिवस चर्चेचे गुर्हाळ कायम राहणार आहे. महायुती म्हणून लढण्याचे जवळपास निश्चित झाले असले तरी याप्रश्नी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याबाबत मंत्री पाटील यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांनी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. समविचारी मंडळींना बरोबर घेण्याचे त्यांनी सूतोवाच दिले असतानाच रविवारी महायुतीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. येत्या दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होऊन महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत निश्चित होण्याची शक्यता आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, भाजपचे नेते सावकार मादनाईक, मिलिंद भिडे, आदित्य पाटील-यड्रावकर, मिलिंद साखरपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यड्राव, दत्तवाड जागेची भाजपकडून मागणी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्वी दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघाची मागणी केली होती. त्यानंतर आता यड्राव जिल्हा परिषद गटाची मागणी ही केली आहे. यावर मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार यड्रावकर व इतर पदाधिकार्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. मात्र, तोडगा निघालेला नाही. शिरोळ तालुक्यातील महायुतीच्या लोकप्रतिनिधींची चर्चा झाल्यानंतर जागेचा तिढा सुटणार आहे. याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.